Sun, Mar 24, 2019 04:50होमपेज › Pune › आंदोलनकाळात ‘पांढर्‍याचे काळे’!

आंदोलनकाळात ‘पांढर्‍याचे काळे’!

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्‍काजाम आंदोलनामुळे पुणे शहरात दुधाची टंचाई जाणवली. संकलन न झाल्याने चितळे दूध विक्रीस उपलब्ध नसल्याचा मोठा फटका ग्राहकांना बसला. त्यामुळे शहरात काही ठिकाणी चढ्या भावाने दूध खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली. कात्रज दूध संघाच्या दूध विक्रीत नेहमीपेक्षा सुमारे 25 हजार लिटरने वाढ झाली, तर गणेश पेठेतील दूध भट्टी केंद्रांवर म्हशीचा दुधाच्या भावात मोठी वाढ होऊन लिटरचा भाव 71 रुपयांवर पोहोचल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.  शहरात चितळे तसेच इतर संस्थांचे दूध उपलब्ध नसल्याने ग्राहकांनी उपलब्ध असणारे दूध खरेदीस प्राधान्य दिले. त्यामुळे विक्रेत्यांनी लिटरमागे पाच ते सहा रुपये जादा भावाने म्हशीच्या दुधाची विक्री केली. 

ग्राहकांना 60 रुपये लिटर भावाने दूध खरेदी करावी लागल्याने आंदोलनाची झळ बसली.गणेश पेठ दूध भट्टी बाजारात गुरुवारी म्हशीच्या दुधाची विक्रीचा 18 लिटर घागरीचा भाव 260 रुपयांनी वधारून तब्बल 1280 रुपयांवर पोहोचला. म्हणजे म्हशीच्या दुधाची विक्री 71 रुपये लिटर या भावाने झाल्याची माहिती व्यापारी दामोदर हिंगमिरे यांनी दिली. 
पाऊच पॅकिंगमधील दुधाची आवक कमी झाल्याने अमृततुल्य विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांची मागणी वाढल्याने भाववाढीला चालना मिळाली. दरम्यान, काही किराणा मालाच्या दुकानदारांनीही त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या पॅकिंगमधील दुधाची जादा दराने विक्री केली.

गुरुवारी विक्रीसाठी दूध उपलब्ध नव्हते. मात्र, सांगलीमध्ये केंद्रांवर नियमित दूध संकलन सुरळीत सुरू झाले आहे. तेथून पुण्यात आज (दि. 20) विक्रीसाठी म्हशीचे दूध उपलब्ध होईल. नेहमीच्या तुलनेत नव्वद टक्क्यांइतका दूध पुरवठा शहरात होण्याची अपेक्षा आहे. 

- श्रीकृष्ण चितळे
संचालक, चितळे दूध


‘कात्रज’चा पुरवठा आजपासून सुरळीत

कात्रज दुधाची विक्री नेहमीपेक्षा सुमारे 25 हजार लिटरने अधिक झाली. गायीच्या दुधाची 40 रुपये लिटरने विक्री करण्यात आली. गुरुवारी जिल्ह्यात संकलन झाल्याने शुक्रवारी दूध पुरवठा सुरळीत सुरू होण्याची अपेक्षा आहे.