Sun, Mar 24, 2019 23:50
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › विरंगुळा केंद्राची सुरक्षा रामभरोसे

विरंगुळा केंद्राची सुरक्षा रामभरोसे

Published On: Jan 15 2018 7:25AM | Last Updated: Jan 15 2018 1:48AM

बुकमार्क करा
येरवडा : वार्ताहर

सव्वा दोन वर्षाच्या चिमुकलीचा महापालिकेच्या विरंगुळा केंद्रातील पाण्याच्या टाकीत पडून जीव गेला. त्या विरंगुळा केंद्राची सुरक्षा रामभरोसेच आहे. त्याठिकाणी पालिकेतर्फे सुरक्षा रक्षकच नेमला नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले.  दरम्यान,  ज्या लेबर कॅम्पवर लोखंडे कुटुंबिय रहावयास होते त्या घटनेस जबाबदार असणार्‍या बिल्डर, ठेकेदारांना मात्र येरवडा पोलिस सॉफ्ट कॉर्नर देण्याच्या तयारीत असल्याचे चौकशीवरून दिसत आहे.

दशमी सुनील लोखंडे या सव्वादोन वर्षाच्या मुलीचा समोर असणार्‍या महापालिकेच्या विरंगुळा केंद्रातील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिकेच्या विरंगुळा केंद्राचा व मजूर कॅम्पच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या सुरक्षा पाँईटमध्ये विरंगुळा केंद्र नसल्याचे महापालिकेला  खासगी सुरक्षा रक्षक पुरविणारे सैनिक इंटलिजएट सिक्युरीटीचे   सुपरवायझर बालाजी पाटील यांनी सांगितले. याठिकाणी महापालिकेचा ठेका असलेले रक्षक सिक्यिुरिटीचे यापूर्वीचे कर्मचारी रूपेश जगताप, किशोर नगरे, उत्तम जगताप हे दोन महिन्यांपासून अधिकृत नेमणुक नतसाना देखील ड्युटी करत आहेत. याठिकाणी पाणी भरण्यासाठी येणार्‍या मजुरांना अटकाव केला जात नव्हता. त्यामुळे चिमुकलीचा जीव गेला असल्याचे दिसून येत आहे.  

दशमीच्या मृत्यूस जबाबदार म्हणून संबंधित बिल्डर व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्ष नीता गलांडे यांनी केली आहे. याबाबत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त वसंत पाटील म्हणाले, विरंगुळा केंद्राबाबत नागर वस्ती विभागाला कळविले आहे. सद्यस्थितीत बचत गटाच्या बैठका याठिकाणी चालतात.  सुरक्षेबाबत विचारणा केली असता, त्याठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणुक करणे आवश्यक आहे.  मजूर कॅम्पच्या परवानगीची माहिती  बांधकाम विभागालाच असावी असेही त्यांनी सांगितले. बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी मात्र मजूर कॅम्पविषयी उत्तर देणे टाळले आहे. येरवडा पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली असून त्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. सद्यस्थितीत अधिकारी व पोलिस मुख्य बिल्डर व ठेकेदार यांना क्लिनचिट देत आहेत. यामागे नक्कीच अर्थपूर्ण व्यवहार झाले असल्याचे सुज्ञ नागरीक बोलत आहेत.