Sat, Jun 06, 2020 19:50होमपेज › Pune › ‘महिला व बालविकास’ कार्यालय समस्यांच्या गर्तेत 

‘महिला व बालविकास’ कार्यालय समस्यांच्या गर्तेत 

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 04 2017 12:25AM

बुकमार्क करा

पुणे : ज्योती भालेराव-बनकर 

शहरातील जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाची अत्यंत दुरवस्था आहे. कमी जागेत जास्त कर्मचारी आणि फाईलींच्या गर्दीत येथील काम चालते. अनेक ठिकाणी अपुर्‍या सोयी-सुविधा आहेत. कोंदट वातावरण, आजूबाजूला फाईलींचे बांधलेले गठ्ठे यांच्या बाजूने बसलेले कर्मचारी असे चित्र बघायला मिळते. गेल्या पस्तीस वर्षांपासून या ठिकाणच्या इमारतीत हे कार्यालय भाडेतत्त्वावर आहे.

अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांना अर्ज, निवेदन करूनही शासनाकडून या कार्यालयाच्या कायमस्वरूपी जागेसाठी कोणतीही तरतूद करण्यात येत नाही; त्यामुळे याच जागेत अनेक गैरसोयींचा सामना करत येथील कारभार चालू आहे. हे कार्यालय शहरातील मध्यवर्ती भागातील मंगला चित्रपटगृहाच्या मागील बाजूस शिक्षण मंडळ कार्यालयाच्या शेजारील जागेत आहे. मात्र या ठिकाणी हे कार्यालय आल्याची कोणतीही खूण येथे नाही. सामान्य माणसांना सहजासहजी हे कार्यालय सापडत नाही. 

रंग उडालेल्या अवस्थेतील कार्यालयाच्या नावाच्या पाटीवरूनच या कार्यालयाची दुरवस्था दिसून येते. जुन्या इमारतीतील अवघ्या तीन खोल्यांमध्ये चालणार्‍या कार्यालयात अनेक गैरसोयी आहेत. महिला व पुरुष कर्मचार्‍यांसाठी वेगवेगळ्या स्वच्छतागृहांची सोय नाही. कामाच्या ठिकाणी बसण्यासाठी प्रशस्त जागाही नाही. यासंबंधी कोणत्याही अधिकार्‍याशी बोलणे होऊ शकले नाही.