Mon, Mar 25, 2019 02:49
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › हिंजवडी ‘फेज थ्री’पर्यंतचा रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करा

हिंजवडी ‘फेज थ्री’पर्यंतचा रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करा

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 05 2018 1:59AMपिंपरी : प्रतिनिधी 

हिंजवडीत होणारी दररोजची वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिकेचे सावित्रीबाई फुले उद्यान ते हिंजवडी ‘फेज थ्री’पर्यंत फ्री वे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वाकड  उड्डाणपुलाच्या  हद्दीपासून हिंजवडी ‘फेज थ्री’पर्यंतचा 5 कि.मी. अंतराचा रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पालिकेकडे हस्तांतरित करावा,  तसेच, नियोजित उड्डाणपुलासाठी राज्य शासनाने अर्थसहाय करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. 

यावेळी नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, विक्रम वाघमारे उपस्थित होते. राहुल कलाटे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीवरच हिंजवडी इन्फोटेक पार्क विकसित झालेला आहे. हिंजवडीमधील पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी एमआयडीची देखील आहे.

हिंजवडी येथे पुणे व पिंपरी चिंचवडमधील जोड रस्त्यांवरून दररोज सुमारे साडेतीन लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाकड येथून शिवाजी पार्क, हिंजवडी येथे पोहोचण्यासाठी तब्बल दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे मोठा वेळ नाहक वाया जात आहे. तसेच इंधन खर्चामुळे राष्ट्रीय आर्थिक नुकसान होत असून, प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे सावित्रीबाई फुले उद्यान ते हिंजवडी फेज थ्रीपर्यंत फ्री वे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. 

परंतु, वाकड उड्डाणपुलाच्या हद्दी पासून फेज थ्री हद्दी पर्यंतचा रस्ता एमआयडीसीच्या ताब्यामध्ये असल्याने पालिकेमार्फत या जागेवर काम करण्यासाठी एमआयडीसीची परवानगी मिळणे आवश्यक आहे. 

त्यासंदर्भात एमआयडीसीने  परवानगी दिल्यास काम पूर्ण करून देखभाल करणे पालिकेला सोईचे होणार आहे. त्यासाठी हिंजवडी पालिका हद्दीपासून ते हिंजवडी फेज थ्रीपर्यंतचा एमआयडीसीच्या मालकीचा रस्ता पालिकेकडे हस्तांतरित केल्यास आर्थिकदृष्टया देखील फायद्याचे होईल. त्यामुळे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या अभियंता वर्गाचा व वाकड, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी व नाशिक फाटा परिसर, औंध या परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे  वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे, असे कलाटे यांनी सांगितले.