Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Pune › जन्मदात्यांना अखेरच्या वेळी मुखदर्शनही नाही!

जन्मदात्यांना अखेरच्या वेळी मुखदर्शनही नाही!

Published On: Jun 17 2018 11:47AM | Last Updated: Jun 17 2018 11:47AMपुणेः प्रतिनिधी

वडिलांची छोटीशी चहाची टपरी, दोन्ही भाऊ मजूर अशा खडतर परिस्थितीमध्ये प्रियांकाने स्वतःच्या हिंमतीवर शिक्षण घेतले. तसेच आयटी कंपनीत नोकरीही मिळवली. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. खराडी येथे ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात जखमी होऊन तब्येत बरी होत असताना अखेर तिने मृत्यूला कवटाळले. मात्र चेह-यावर आणि शरीरावर जखमा असल्याने तिचा संपूर्ण मृतदेह कपड्यातच अंत्यसंस्कार होईपर्यंत झाकलेला होता. यामुळे आई-वडिलांना तिचे अखेरच्या वेळी मुखदर्शनही करता आले नाही. 

गेल्या महिन्यात 11 मे रोजी खराडीतील ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात  24 वर्षीय  प्रियांका झगडे व तिचा सहकारी  पंकज कृष्णाराव खुणे (वय 26, रा. वारजे,मूळ. वर्धा) गंभीर जखमी झाले होते. प्रियांका मूळची सातारा जिल्ह्यातील नांदवे या गावातील होती. नोकरीनिमित्त ती हडपसर येथे राहत होती. जखमी झाल्यानंतर तिच्यावर कसबा पेठेतील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच अखेर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता तिची मृत्यूशी झुंज संपली.  

घरची कोणतेही शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसताना तिने स्वतःच्या हिंमतीवर बी.ई. कॉम्प्युटर हा कोर्स पूर्ण केला. काही महिन्यांपूर्वी ती खराडीतील झेन्सार आयटी पार्कमधील एका कंपनीत जॉब करत होती.  तिला दोन भाऊ असून ते मजुरी करतात. तर वडील छोटी चहाची टपरी चालवतात.

ट्रान्सफॉर्मरच्या तेलाच्या आगीत प्रियांका 20 टक्के भाजली होती. उकळते तेल तिच्या चेहरा, मान, पाठ, डोक्यावर पडले होते. त्यानंतर तिच्यावर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉ. जयसिंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. सुरूवातीला डॉक्टरांनीही 20 टक्के भाजल्याचे सांगितले. पण, नंतर हे प्रमाण 50 टक्के असल्याचे निदर्शनास आले. 

अगदी आठ दिवसांपर्यंत ती उपचारांना चांगली प्रतिसाद देत होती. तिच्या जखमाही भरून येत होत्या. पण, नंतर त्याच जखमांतूनच तिला संसर्ग झाला आणि नंतर तो वाढल्याने तिचे एकेक करत सर्व अवयव निकामी होत गेले. तिला व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले.  शेवटी, शुक्रवारी तिची अखेरची झुंज संंपली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  दरम्यान,  प्रियांकासोबत भाजलेला तिचा सहकारी पंकज खुने याचाही वर्धा येथे उपचार घेताना आदल्या दिवशी गुरूवारी मृत्यू झाला.

उपचारांसाठी मित्रांनीच केली मदत

उपचारासाठी आठ लाख रुपये खर्च आणि प्रियांकाची घरची परिस्थिती नाजूक . त्यामुळे तिच्या उपचारासाठी पैसे उभे करणे हे आव्हान होते. यावेळी तिच्या गावाकडील व सोबत शिक्षण घेणार्‍या मित्रांनी त्याची जबाबदारी उचलली. तिच्या कंपनीने दीड लाख रुपयांची मदत केली. पण मित्रांनी ‘मिलाफ’ या ऑनलाईन पोर्टलवर तिची माहिती भरून आर्थिक मदतीसाठी अवाहन केले. त्यामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला परदेशांतूनही दात्यांनी भरभरून मदत केली. अवघ्या दहा दिवसांत सात लाखांची रक्‍कम उभी राहिली, अशी माहिती प्रथमेश यांनी दिली.