Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Pune › प्रिंटिंग प्रेसला भीषण आग; दोघांचा मृत्यू

प्रिंटिंग प्रेसला भीषण आग; दोघांचा मृत्यू

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

शिवाजीनगर परिसरातील मिठाईचे बॉक्स तयार करणार्‍या प्रेसच्या ऑफिसला लागलेल्या भीषण आगीत फर्निचरचे काम करणार्‍या दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

लक्ष्मणराम उमाराम सुतार (33) व नरपदसिंग यशवंतसिंग राजपूत (23, पुणे, रा. मूळ राजस्थान) अशी या आगीत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.  शिवाजीनगर परिसरात हिमालया हाईट ही दुमजली इमारत आहे. दुसर्‍या मजल्यावर खासगी कार्यालये आहेत. तर, इमारतीच्या खालच्या मजल्यावर सात दुकाने आहेत. यातील तीन दुकानांमध्ये भंडारी यांचे फूड पॅकेट नावाचे मिठाईचे बॉक्स तयार करण्याचे दुकान आहे. तर, या इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला त्यांची प्रिंटिंग प्रेस आहे. तेथे फर्निचरचे काम सुरू आहे. 

या ऑफिसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून फर्निचर करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुतार व राजपूत आणि आणखी एक अशी तिघे करत होते. काम झाल्यानंतर सुतार व राजपूत हे दोघे प्रेसमधील पोटमळ्यावर झोपत असत. त्यांच्या जेवण्यासाठी गॅस सिलिंडर व इतर साहित्य होते. मंगळवारी दिवसा व रात्री काम करून दोघे आतमध्ये झोपले होते. मात्र, मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे येथील नागरिक तसेच येथील सुरक्षा रक्षकाने पाहिले. त्यांनी आरडा-ओरडा केला.

अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाच्या तीन फायर गाड्या व पाण्याची टँकर्संनी धाव घेतली. त्यातच काही क्षणात मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. दरम्यान आतमध्ये दोघे अडकल्याचे समजल्यानंतर नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ऑफिसचे शटर बाहेरून लॉक असल्याने काहीच करता आले नाही. त्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ते निघू शकले नाही. अखेर जेसीबीच्या साहाय्याने शटर तोडण्यात आले. मात्र, आतमध्ये नवीन फर्निचर, मिठाईचे छोटे बॉक्सची पाकिटे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आग काही क्षणात भडकली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या व एक टँकर आणि पाच अधिकारी व कर्मचार्‍यांनी एका तासानंतर आग आटोक्यात आणली. त्यावेळी आतमध्ये दोन व्यक्तीं जळून ठार झाल्याचे आढळून आले. या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.

तीनशे कुटुंबांचा रोजगार बंद 

गेल्या अनेक वषार्र्ंपासून शिवाजीनगर परिसरात प्रिंटिंग प्रेस आहे. पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये मिठाईचे बॉक्स तयार करून पाठविले जातात. या परिसरातील जवळपास तीनशे कुटुंबाना या प्रेसमधून रोजगार मिळतो. काहीजण प्रिंट केलेले कागद घरी गेऊन जातात व बॉक्स बनवून देतात. बुधवारी सकाळी येथे आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलांनी येथे धाव घेतली. हे पाहताच त्यांचे डोळे पाणावले. प्रेसला आग लागून ती खाक झाल्यामुळे या कुटुंबाचा आता रोजगार बंद पडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.