Fri, Jan 18, 2019 19:25होमपेज › Pune › ‘प्राथमिक’च्या १८ हजार जागा रिक्त

‘प्राथमिक’च्या १८ हजार जागा रिक्त

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:36AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

राज्यातील जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता येत्या 15 जानेवारीपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत हजेरीपत्रकावर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गृहीत धरण्यात येणार आहे. संचमान्यता झाल्यानंतरच अतिरिक्त शिक्षकांची नेमकी संख्या समजणार आहे. परंतु सध्या अतिरिक्त शिक्षकांची संख्या फारच कमी असून रिक्त जागांची संख्या मात्र जवळपास 18 हजार आहे. त्यामुळे 14 हजार शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती चुकीची आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये जवळपास 14 हजार 92 शिक्षक अतिरिक्त असून सर्वात जास्त शिक्षक अमरावतीत तर सर्वात कमी शिक्षक धुळ्यामध्ये असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. एकीकडे शासनाने कमी पटसंख्या आणि खालावलेली गुणवत्ता याची कारणे देत जिल्हा परिषदेच्या 1 हजार 292 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच शिक्षक अतिरिक्त असल्याचे प्रसिद्ध झाल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली.

यासंदर्भात शरद गोसावी म्हणाले, सोशल मीडियावर एक ‘एक्सेल फॉरमॅट’चे पत्र फिरत आहे. त्यामध्ये राज्यातील कोणत्या विभागात किती जागा उपलब्ध आहेत आणि किती जागा रिक्त तसेच अतिरिक्त आहेत, याची आकडेवारी दिसत आहे. या आकडेवारीमध्येच 14 हजार 92 जागा अतिरिक्त असल्याचे दिसून येत आहे. परंतु ही आकडेवारी कोणी दिली आणि ती माध्यमांकडे कशी आली यासंदर्भात काही माहिती नाही. परंतु शाळांच्या संचमान्यतेचे कामच पूर्ण झाले नसल्यामुळे राज्यात नेमकी अतिरिक्त शिक्षकांची संख्या किती आहे, याची परिपूर्ण आकडेवारी देता येणार नाही. तसेच जिल्हा परिषदांमध्ये अतिरिक्त शिक्षक जास्त नसतात. कारण, त्यांचे ताबडतोब समायोजन करण्यात येते. तसेच सध्या जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त शिक्षकांचे महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येत असल्यामुळे एवढ्या अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यात शिक्षक भरतीसाठी नुकतीच अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी घेण्यात आली. तसेच येत्या काही महिन्यांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त असते तर चाचणी घेण्याची गरजच काय, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.