Sat, Jul 20, 2019 15:20होमपेज › Pune › शिक्षक बदल्यांमध्ये महापालिकेच्या दहा अधिकार्‍यांवर ठपका

शिक्षक बदल्यांमध्ये महापालिकेच्या दहा अधिकार्‍यांवर ठपका

Published On: Apr 28 2018 1:08PM | Last Updated: Apr 28 2018 1:13PMपुणे : प्रतिनिधी

 शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महापालिकेसह तत्कालीन शिक्षण मंडळातील तब्बल दहा अधिकारी व कर्मचार्‍यांवर दोषी असल्याचा ठपका ठेवला आहे.  महापालिका प्रशासनाने या दोषी आढळलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी असे एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

 महापालिकेचे शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार घडला होता. या प्रकरणात एका शिक्षकाकडे लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने १८ जुन २०१५ ला सापळा रचून कारवाई केली होती. त्यात शिक्षण मंडळाच्या तत्कालीन आजी-माजी अध्यक्षांसह एका लिपिकेला रंगेहाथ पकडण्यात आले होते. या आंतरजिल्हा बदली प्रकरणाची चौकशी एसीबीकडून सुरू होती. त्यासंबधीचा चौकशी अहवाल नुकताच एसीबीने महापालिका आयुक्तांना पाठविला आहे. या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून शिक्षण मंडळांच्या तीन माजी शिक्षण प्रमुखांसह उपशिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ क्लार्क आणि महापालिकेच्या एका अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह तब्बल दहा जण चौकशीत दोषी आढळून आले आहेत.

एसबीने दिलेल्या चौकशी अहवालात आंतर जिल्हा बदल्या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यांनी कशा प्रकारे गैरव्यवहार केला याचाच पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे एससीबीने १८ जुनला कारवाई केल्यानंतर या प्रकरणातील दोषी कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी कशा पध्दतीने प्रयत्न केले. तसेच खोटी माहिती आणि कागदपत्रे तयार करून एसीबीचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.  धक्कादायकबाब म्हणजे या प्रकरणात महापालिकेच्या काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे हात गुंतले आहेत. तेही या प्रकरणात दोषी आढळून आले आहेत. या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यताही एसीबीने या चौकशी अहवालात व्यक्त केली आहे. हा अहवाल महापालिका आयुक्तांकडे आला आहे. शिक्षण मंडळ बरखास्त झाले असल्याने हे सर्व अधिकारी कर्मचारी आता महापालिका प्रशासनाच्या अखात्यारित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाकडून पुढे काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय होते नक्की प्रकरण

महापालिका शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, औरंगाबाद व उस्मानाबाद या जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यानुसार करण्यात येणार होत्या, त्यासाठी ३० शिक्षकांची यादी निश्‍चित करण्यात आली होती, मात्र यामधील काही शिक्षकांची नावे अंतिम यादीत काढून त्यांच्याऐवजी इतर शिक्षकांची नावे घुसविण्यात आली होती. या प्रकरणात एका शिक्षकाकडे लाच मागण्यात आली होती. त्याने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली होती. त्यात मंडळाचे तत्कालीन आजी-माजी अध्यक्ष व एका क्लार्कला अटक करण्यात आली होती.

क्लार्कला बनविले बळीचा बकरा

आंतर जिल्हा बदली प्रकरणात एसीबीने मंडळ कार्यालयात सापळा रचून कारवाई केली होती. त्यात या क्लार्कला अटक करण्यात आली होती. मात्र, यासर्व प्रकरणात संबधित क्लार्कला वळीचा बकरा बनविण्यात आल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे. वरिष्ठांनी स्वत:ला आणि मर्जीतील कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी या क्लार्कचा बळी दिला. त्यासाठी त्याच्या बदलीचे खोटे आदेशही तयार केले गेले असल्याचे समोर आले आहे.

अधिकारी कर्मचार्‍यांचा बँकॉक पटाया दौरा

महापालिकेच्या ज्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या प्रकरणात दोषी धरण्यात आले आहे, त्यांनी एकत्रितरित्या बॅकॉक, पटायाचा परदेश दौरा केला असल्याचे या चौकशीत आढळून आले. धक्कादायक म्हणजे महापालिकेची परवानगी न घेता ही परदेशवारी करण्यात आली आहे.