होमपेज › Pune › अन्यथा सामूहिक आत्महत्या करू

अन्यथा सामूहिक आत्महत्या करू

Published On: Apr 20 2018 1:16AM | Last Updated: Apr 20 2018 12:42AMप्रदीप लोखंडे

पिंपरी : कामगारांना सहा महिने पगारच दिलेला नाही. घर कसे चालवायचे असा प्रश्‍न पडला आहे. कंपनी प्रवेशद्वारासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे; मात्र कंपनी व्यवस्थान याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे प्रश्‍न न सुटल्यास कंपनी कामगारांना घेऊन सामूहिक आत्महत्या करू, असा गंभीर इशारा प्रिमियम कंपनी कामगारांनी ‘पुढारी’ शी बोलताना दिला.

प्रिमियम कंपनीतील कामगारांना सहा महिन्यांपासून पगारासह विविध देय रकमा, आर्थिक लाभ मिळला नसल्याने आर्थिक कोंडी झाली असल्याचा आरोप करत कायम कर्मचार्‍यांनी प्रिमियम लिमिटेड कंपनीच्या प्रवेशद्वारात गेल्या अकरा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आले. औद्योगिक न्यायालयाने आदेश देऊनही कंपनी व्यवस्थापन दाद देत नसल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला. 

कंपनीमध्ये सीएनसी मशिन बनविण्याचे काम केले जाते. या कंपनीमध्ये सुमारे 215 कायमस्वरूपी कामगार काम करतात. कंपनी व्यवस्थापनाकडून गेल्या 6 ते 7 वर्षांपासून कामगारांना दरमहा पगार दिला जात नाही. प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे वेळेत भरले जात नाही. करारात ठरल्याप्रमाणे एलटीएची रक्‍कम दिली जात नाही. पगारातून कपात केलेली सोसायटीची सुमारे दोन कोटी रक्‍कमही कामगारांना दिली नाही. पगारातून कपात केलेली एलआयसीची रक्‍कम एलआयसीमध्ये भरली जात नाही. सेवानिवृत्‍त कामगारांची गॅ्रच्युयटी दिली जात नाही. या सर्व गोष्टींमुळे कामगारांची आर्थिक कोंडी केली जात आहे. पीएफचे पैसे न भरल्याने कामगारांना पीएफ काढता येत नाही. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाची पायमल्‍ली करण्याचे काम व्यवस्थापनाने केले आहे. या प्रकारे न्यायालयाच्या निकालाची पायमल्‍ली करून कामगारांना वेळेत वेतन न दिल्याने कामगारांना कौटुंबिक अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ कंपनी प्रवेशद्वारावर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. या बाबत कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही सकारात्मक चर्चा झाली नसल्याचे  कामगारांनी सांगितले. या बाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.