Mon, Mar 25, 2019 05:19
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न

नेतृत्व प्रस्थापित करण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 2:03AM

बुकमार्क करा
पिंपरी ः नंदकुमार सातुर्डेकर

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद कडकडीत ठरला. भाजपाबरोबर सत्तेत असल्याने आरपीआय (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांची ठोस भूमिका घेताना गोची झाली; पण या बंदनिमित्त दलितांची अस्मिता जागी करत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.  मात्र निवडणुकीच्या राजकारणात त्यांना  याचा लाभ मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. 

दलित ऐक्याबाबत अनेक वेळा बोलले गेले; मात्र त्यात यश आले नाही. दलित समाजाचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांपैकी नामदेव ढसाळ, रा. सू. गवई यांचे निधन झाले, जोगेंद्र कवाडे यांचा फारसा प्रभाव राहिला नाही. आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोन नेते समाजाचे प्रभावीपणे नेतृत्व करत आहेत. यांतील रामदास आठवले हे शिवशक्ती-भीमशक्तीने एकत्र यावे या शिवसेनाप्रमुखांच्या आवाहनास प्रतिसाद देत मागे  शिवसेनेबरोबर गेले. या एकत्रीकरणाची मुहूर्तमेढ पिंपरी कॅम्प येथील  डिलक्स चौकात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व रामदास आठवले यांच्या झालेल्या सभेने त्या वेळी रोवली गेली. ‘आम्ही जय महाराष्ट्र म्हणतो; पण तुम्ही जय भीम म्हणत नाही,’ अशी खंत आठवले यांनी मांडली, तेव्हा मनोहर जोशी यांनी, ‘एवढ्यासाठीच शिवशक्ती भीमशक्तीचे घोडे अडले असेल, तर वेळ कशाला? आतापासून जय भीम म्हणतो,’ असे सांगत वातावरण निर्माण केले. युती झाली. लोकसभेला भाजप, सेना, आरपीआय (आठवले गट) एकत्र लढले. विधानसभेला युती तुटल्यावर आठवले यांनी भाजपबरोबर जाणे पसंत केले; मात्र चळवळीत तयार झालेल्या आठवलेंची भाजपाबरोबर सत्तेत असल्याने गोची होत आहे. 

खैरलांजी, खर्डा प्रकरण, रोहित वेमुलाची आत्महत्या, अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या मागणीसाठीचा मोर्चा, भीमा कोरेगावची घटना यामुळे दलित समाज संघटित होत आहे.  भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी संघटनांनी जो बंद पुकारला त्याचे नेतृत्व करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी  स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न  केला आहे.  निवडणुकीच्या राजकारणात याचा लाभ त्यांना मिळणार का,  याबाबत उत्सुकता आहे.