होमपेज › Pune › ‘अतिरेकी केजरीवाल’वरून जावडेकरांचे घूमजाव

‘अतिरेकी केजरीवाल’वरून जावडेकरांचे घूमजाव

Last Updated: Feb 15 2020 12:24AM
पुणे : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीतील ‘अतिरेकी केजरीवाल’ वक्तव्याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घूमजाव केले आहे. ‘अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेतआणि त्याचे अनेक पुरावे आहेत,’ या स्वरूपाचे कोणतेही वक्तव्य आपण केले नव्हते, असे जावडेकर यांनी शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. ‘गोली मारो’ आणि ‘भारत पाक सामना’ या वक्तव्याशिवाय दिल्लीत भाजपच्या पराभवाची इतर कारणे असल्याचेही जावडेकर म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी ‘गोली मारो’ आणि ‘भारत पाक सामना’ यांसारख्या द्वेषयुक्त भाषणामुळे भाजपचा पराभव झाल्याचे सांगितले गेले; त्यावर विचारले असता जावडेकर म्हणाले, शहा यांनी नोंदविलेली निरीक्षणे महत्त्वाची आहेत; परंतु पराभवाची इतरही कारणे आहेत, त्याचे पुनरावलोकन केले जाईल. दिल्लीत काँग्रेस लुप्त झाल्याने भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात सरळ लढत झाली. त्यामुळे पराभव पत्करावा लागल्याचेही जावडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या लढाईत काँग्रेसची मते ‘आप’कडे वळल्याचे स्पष्ट दिसून आले.

निवडणुकांमध्ये काँग्रेस दूर गेल्याने भाजप पराभूत झाली. भाजपला 42 टक्के आणि आपला 48 टक्के मते मिळतील, असा अंदाज बांधला होता. मात्र, आपला 51 टक्के आणि भाजपला 39 टक्के मते मिळाली. आमचा फक्त तीन टक्के अंदाज चुकला. पत्रकार परिषदेला खा. गिरीश बापट, खा. अमर साबळे हेही उपस्थित होते.