Tue, Apr 23, 2019 06:06होमपेज › Pune › टीका करून मोठे व्हायला खेडमध्ये संधीच नाही

टीका करून मोठे व्हायला खेडमध्ये संधीच नाही

Published On: Feb 21 2018 1:28AM | Last Updated: Feb 21 2018 12:35AMराजगुरुनगर : कोंडीभाऊ पाचारणे

विद्यमान नेतृत्व आणि त्याच्या कार्य पध्दतीवर टीका केली की, राजकारणात मोठे होता येते. हे खेड तालुक्यातील आमदारकीचे पारंपरिक समिकरण सुरू असलेल्या पंचवार्षिक काळात बाजूला पडले आहे. जनतेचा कौल घेण्यासाठी लोकांपर्यंत जाण्याशिवाय तालुक्यातील इच्छुकांना पर्याय उरलेला नाही. म्हणूनच आनंदाचा असो की, दुःखाचा विविध कार्यक्रमांमधून आमदारकीच्या इच्छुकांची उपस्थिती तालुकाभर वाढल्याचे दिसून येत आहे. 

खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार याना मानणारा मतदार वर्ग. मात्र, गेल्या निवडणुकीत याच पक्षाचे कट्टर समर्थक असलेले सुरेश गोरे यांनी शिवसेनेची उमेदवारी घेऊन पक्षाला धडा शिकवला. सलग दोनदा आमदार राहिलेल्या आणि कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचा दावा करणा-या दिलीप मोहिते यांचा 32 हजार मतांनी गोरे यांनी पराभव केला. कुठलीही लाट नव्हती. फक्त मोहिते नको या नकारात्मक मतदानाने गोरे खूप पुढे गेले. माजी आमदार स्व. नारायणराव पवारांवर प्रखर टीका करून दिलीप मोहिते आमदार झाले. मोहितेंवर टीका करून गोरे उदयाला आले. गोरे मोहितेंच्या तुलनेत विकास कामात मागे पडले आहेत. कमी बोलतात, कुणाच्या टीकेला प्रत्युत्तर देत नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शांतता आहे असे मानले जात असून गोरेंच्या विरोधात काय बोलावे? हा प्रश्‍न विरोधकाना पडत आहे.

येणा-या निवडणुकीत शिवसेनेकडून गोरे आणि राष्ट्रावादीकडून मोहिते उमेदवार असण्याची चिन्हे आहेत.दोघे एकमेकाना तगडे आव्हान ठरणारे उमेदवार आहेत.सुरेश गोरे हे शिवसेनेचे दावेदार उमेदवार असतील आणि मोहिते राष्ट्रवादीचे. मात्र राजकारणात काहीही शाश्‍वत नसते, स्थिर नसते. कारण सेनेकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम गावडे हे इच्छुकांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कट्टर समर्थक सैनिक म्हणून गावडे यांची तालुक्यात ओळख आहे. राम गावडे विविध कार्यक्रमांमधून तालुक्यात वावरताना दिसून येत आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून सेनेचा तळागाळातील कार्यकर्ता गावडे यांच्याशी जोडल्याचे जाणवते. 

माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडे खेड तालुक्यात काही राजकीय सत्तास्थाने आहेत.त्यात जिल्हा बँक, बाजार समिती यांचा समावेश आहे.असे असले तरी त्यांच्या स्वभावामुळे विधानसभा निवडणुकीद्वारे पक्षाला मोठी हानी सोसावी लागल्याचे संकेत वरच्या पातळीवर गेले आहेत. गतवर्षी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मोहिते गट तथा पक्षाला मतदानातून फार कमी प्रतिसाद मिळाला. येत्या निवडणुकीला म्हणूनच पक्ष उमेदवारी देताना बदल करू शकतो. असे झाल्यास नव्या दमाचा दावेदार म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे यांचा चेहरा समोर येऊ शकतो. स्व नारायणराव पवार यांचे नातू ऋषीकेश पवार यांनाही संधी मिळू शकते. याशिवाय शिवसेनेने सुरेश गोरे यांना टाळल्यास गोरे सुध्दा राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतात, असे तालुक्यात मानले जात आहे. या तीनही नेत्यांचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निकटचा सबंध आहे. पवार कुटुंबाच्या नुकत्याच झालेल्या एका विवाह समारंभात अजित पवार एक तास बसून होते. 

सर्व शक्यता गृहीत धरून आमदार गोरे, माजी आमदार मोहिते आणि संभाव्य इच्छुक लोकांपर्यत जाण्यात सध्या मग्न आहेत. पंचायत समिती आणि बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर हे देखील जनतेच्या संपर्कात आहेत. सकाळी दशक्रिया,दुपारी साखरपुडा आणि सायंकाळी लग्न, पूजा, वाढदिवस असे भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन इच्छुकांच्या यादीत पहायला मिळते. स्वत:चा किंवा कार्यकर्त्यांचा वाढदिवस, निवड अशी संधी साधून फ्लेक्साबाजीला देखील तालुक्यात उधाण आलेले आहे.सोशल मीडियाद्वारे रोज नवनवीन डिझाईन तयार करून आपला चेहरा मतदारराजापर्यंत पोहचविण्याचे काम होत आहे.

सातकर गटाची भूमिका महत्त्वाची

तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार स्व. साहेबराव तथा आप्पासाहेब सातकर यांच्या गटाला महत्त्व आहे. सहकारात रुजलेला सातकर गट ज्या बाजूला त्या बाजूचा आमदार निवडणुकीत विजयी होतो, हे समीकरण अनेक वर्षे सुरू आहे. आप्पासाहेब सातकर यांचे चिरंजीव हिरामण सातकर हे जिल्हा सहकारी बोर्डाचे सलग दुस-यांदा अध्यक्ष झाले आहेत. तर महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर संचालक म्हणून पुणे विभागातून त्यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही निवडी अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार झाल्याचे मानले जात आहे.सातकर गटाची ही जुळवा-जुळव विधानसभेच्या अनेक बदलांना कारणीभूत ठरू शकते.

भाजपाची भूमिका संदिग्ध

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीची तालुक्यात ताकद वाढली आहे.विधानसभेला राज्यात सेना, भाजप एकत्र लढण्याचे संकेत आहेत. खेडची जागा सेनेला सोडली जाईल. युती न झाल्यास भाजपाकडून जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख यांपैकी एक आखाड्यात येऊ शकतात. तूर्त विविध कार्यक्रमांमधून अतुल देशमुख तालुकाभर फिरत आहेत. हे दोन्ही नेते सुरेश गोरे किंवा दिलीप मोहिते यांना मदत करणार नसल्याची चर्चा तालुक्यात आहे.