Wed, Jul 24, 2019 12:27होमपेज › Pune › राजकीय वरदहस्तामुळे  गुन्हेगारी फोफावली 

राजकीय वरदहस्तामुळे  गुन्हेगारी फोफावली 

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:08AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

शहरात गुन्हेगारी फोफावली असून, या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. शहरात सुुरू असलेल्या वाहन तोडफोडीचे नुकसान वाहन मालकांना देण्यात यावे, या मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी देणार असल्याचेही खा. बारणे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना कार्यालयात मंगळवारी खा. बारणे यांनी पत्रकारांशी बोलताना हे आरोप केले. गेल्या आठ दिवसांपासून शहराच्या विविध भागांत दररोज गोरगरिबांच्या वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत. वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक भेदरला आहे. गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून, गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त दिला जातो, हे चिंताजनक आहे. गुन्हेगारांना राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलिस कारवाई करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. गुन्हेगारांवर पोलिसांची जरब राहिली नसल्याने त्यांना रान मोकळे झाले आहे. 

गुन्हेगारांना पोलिसांनी कारवाईसाठी आणले की, लगेच शहरातील राजकीय नेत्यांचा फोन येतो आणि पोलिस कारवाई न करता त्यांना सोडून देतात, हे चुकीचे आहे.  शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत पोलिस आयुक्त, परिमंडळ तीनचे उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षकांपासून सगळ्यांना या अगोदर पत्रव्यवहार केला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीची तक्रार उद्या (बुधवारी) किवळे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांच्याकडे करणार असल्याचे खा. बारणे यांनी सांगितले.