होमपेज › Pune › पोलिस बंदोबस्तात पुणे शहरात दूध आणणार : दुग्ध विकास विभागाचा दावा 

पोलिस बंदोबस्तात पुणे शहरात दूध आणणार : दुग्ध विकास विभागाचा दावा 

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

दूध आंदोलनाच्या पार्श्‍वभूूमीवर पुणे शहरात सोमवारी दुधाची नियमित आवक अपेक्षित असून टंचाई जाणवणार नसल्याचा दावा दुग्ध विकास विभागाने केला आहे. तसेच प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयाने पोलिस बंदोबस्तात दूध आणण्यासाठी सहकारी दूध संघांना मदत दिल्याचे सांगण्यात आले. शहराला 15 लाख लिटरइतक्या दुधाची गरज असते. यातील दूध रविवारी रात्री उशिरापर्यंत शहरात आल्यामुळे उपलब्धता चांगली राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

कात्रज दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले की, शहरात पश्‍चिम महाराष्ट्रातून सुमारे पाच ते सहा लाख लिटर दुधाची आवक होते. असंघटित क्षेत्रातून किंवा गावोगावातूनही थेट शहरात पाच लाख लिटर दुधाची विक्री केली जाते. तर सहकारी दूध क्षेत्राचा वाटा सुमारे पाच लाख लिटर इतका आहे. रविवारी (दि.15) दुधाची आवक नियमितपणे झालेली आहे. जे शेतकरी संघाकडे दूध आणतील ते दूध स्वीकारण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध होणार्‍या दुधाची विक्रीही केली जाईल. प्रादेशिक दुग्ध विकास अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील दूध संकलनापासून शहरातील मुख्यालयापर्यंत पोलिस बंदोबस्त देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे दुधाची उपलब्धता नेहमीप्रमाणे अपेक्षित आहे.

दुग्ध वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी सहकारी दूध संघांकडून संकलन कमी प्रमाणात होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच काहींनी पाठिंब्याची भूमिकाही उघडपणे घेतली आहे. या स्थितीत पुण्यात येणारा दूध पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. मात्र, शिल्लक साठा आणि रविवारी दिवसभर झालेली आवक यामुळे सोमवारी दूधाची उपलब्धता चांगली राहील, असेही सांगण्यात आले.    

गणेश दूध भट्टीवर आवक वाढण्याची शक्यता  

गणेश पेठ दूध भट्टी केंद्रांवर रोजची 4 ते 5 हजार लिटरइतक्या म्हशीच्या दुधाची आवक होत असते. रविवारी 18 लिटर घागरीचा भाव 900 रुपये याप्रमाणे स्थिर असल्याची माहिती व्यापारी दामोदर हिंगमिरे यांनी दिली. दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून बंदच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे. भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, हवेली तालुका आणि शहरातील गवळ्यांकडून दुधाची आवक बाजारात होते. पावसामुळे सध्या दुधाला मागणी कमी आहे. दही, लस्सीला सध्या मागणी कमी आहे. चहाच्या दुकानदारांकडून सध्या नियमित मागणी आहे. ही मागणी सोमवारपासून वाढू शकते.