Wed, Jun 26, 2019 23:51होमपेज › Pune › पोलिसाच्या पिस्तुलातून गोळी सुटून मित्र जखमी

पोलिसाच्या पिस्तुलातून गोळी सुटून मित्र जखमी

Published On: Mar 22 2018 1:34PM | Last Updated: Mar 22 2018 3:34PMपुणे : प्रतिनिधी 

पुणे पोलिस दलातील  कर्मचारी  मंदिरात गेल्यानंतर खाली वाकल्यावर त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी सुटून कर्मचार्‍याचा मित्र गंभीर  जखमी झाल्याची घटना बिबवेवाडी परिसरात गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिस  कर्मचार्‍यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी झालेल्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती  स्थिर आहे. 

गणेश प्रकाश कांबळे (24, सुपर इंदिरा नगर)  असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर अशोक विलास ढावरे (24, सुपर इंदिरा नगर)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. ढावरे याच्यावर  भादंवि 336, 338 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी आकाश कांबळे (27,सुपर इंदिरा नगर) या तरुणाने फिर्याद दिली आहे. 

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अशोक ढावरे पुणे पोलिस दलात मुख्यालयात पोलिस शिपाई पदावर नेमणुकीस आहेत. ते पुण्यातील एका  लेखक व व्याख्यात्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून त्यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. अशोक ढावरे हे बिबवेवाडी परिसरातील सुपर इंदिरा नगर येथे  राहण्यास आहेत. तर जखमी गणेश कांबळे हे देखील सुपर इंदिरा नगर येथे राहण्यास आहेत. दोघे एकमेकांचे मित्र आहेत.

ढावरे रोजच्याप्रमाणे सकाळी घरातून कामावर जाण्यासाठी निघाले. त्यावेळी गणेश कांबळे हादेखील त्यांच्यासोबत होता.  ते सुपर इंदिरा नगर परिसरातील  गणेश नगरमध्ये असलेल्या मारुती मंदिरात दर्शन घेण्यासाठी दोघेही साडेदहाच्या सुमारास गेले.  दर्शन घेतल्यावर बुटाची लेस बांधण्यासाठी  ढावरे खाली वाकले. त्यांच्या कमरेला रिव्हॉल्वर होते. त्यांचा उजवा हात रिव्हॉल्वरच्या ट्रीगरवर पडल्याने अचानक रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली  आणि ती  मागे उभ्या असलेल्या गणेश कांबळे याच्या पोटात घुसली.  

गणेश कांबळे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर रिव्हॉल्व्हर निष्काळजीपणाने हाताळल्याप्रकरणी ढावरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी दिली.

Tags : police, gun firing, police injured, in pune pudhari crime news, Pune news, Pune crime news