होमपेज › Pune › ‘पीएमपी’च्या प्रवासी, उत्पन्नातही भरीव वाढ

‘पीएमपी’च्या प्रवासी, उत्पन्नातही भरीव वाढ

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:38PM

बुकमार्क करा
पुणे : पीएमपीने जोमाने प्रगती करीत गेल्या नऊ महिन्यांमध्ये प्रवासी संख्येबरोबरच उत्पनात वाढ करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार एप्रिल ते डिसेंबर 2016 या कालावधीपेक्षा एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत सुमारे 18 कोटी 41 लाख 90 हजार 360 रुपयांनी उत्पन्न मिळाले आहे. तर, याच कालावधीत दररोज 6 लाख 69 हजार 783 रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे; तसेच मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी  प्रवासी संख्या 50 हजार 819 एवढी वाढून ती  10 लाख 71 हजार 425 वर पोहचल्याचे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले. 

तुकाराम मुंढे यांनी पीएमपीची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक आमूलाग्र बदल केले. गेल्या नऊ महिन्यांत केलेल्या कामाचा आणि भविष्यातील नियोजनासंदर्भात  मुंढे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 
मुंढे म्हणाले, विविध मार्गावरील बसेसची संख्या वाढविणे,  प्रवाशांना सुरक्षित बससेवा देणे, चालक, वाहकाची वर्तणूक, बसमार्गांचे सुसूत्रीकरण या बाबींकडे अधिक लक्ष दिल्याने एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत पीएमपीचे उत्पन्न 414 कोटी 80 लाख 86 हजार 853 रुपयांवर जाऊन पोहचले. तेच गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर 2016 पर्यंत 396 कोटी 38 लाख 96 हजार 493 एवढे होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत  सुमारे  18 कोटी 41 लाख 90 हजार 360 रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे. या उत्पन्न वाढीमुळे पीएमपीचा तोटा कमी होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच  एप्रिल ते डिसेंबर 2016 पर्यंत रोज किमान 1 कोटी 44 लाख 14 हजार 169 एवढे  उत्पन्न मिळत होते; मात्र एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत हे उत्पन्न 1 कोटी 50 लाख 83 हजार 952 वर पोहचले. यावर्षी रोजच्या उत्पन्नात 6 लाख 69 हजार 783 रुपयांची वाढ झाली आहे.  

पीएमपीने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन बहुतांशी बस मार्गांची फेररचना केली; तसेच काही नवीन मार्ग सुरू केले. त्यामुळे  एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत सुमारे 10 लाख 71 हजार 425 एवढी प्रवासी संख्या झाली. 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये रोजच्या प्रवासी संख्येत 50 हजार 819 एवढी वाढ झाली; तसेच  2016 - 17 च्या तुलनेत डिसेंबर 2017 अखेरपर्यंत मार्गावरील बससेची संख्या सरासरी 42 ने वाढली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2016 मध्ये ही संख्या 1 हजार 383 एवढी होती. तर, डिसेंबर 2017 अखेरपर्यंत 1 हजार 425 एवढी होती.