Tue, Jun 02, 2020 20:15होमपेज › Pune › ‘पीएमपी’वर दगडफेक करणार्‍यास सक्‍तमजुरी

‘पीएमपी’वर दगडफेक करणार्‍यास सक्‍तमजुरी

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी 

दारुच्या नशेत पीएमपी बसच्या काचेवर दगडफेक करुन दहा हजार रुपयांचे नुकसान करणार्‍याला एक वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. नंदनवार यांनी सुनावली.  

अमित गोपाल सादक (23 रा. वडगावशेरी, दत्तमंदिराजवळ, प्लाझा बिल्डींगमागे ) असे त्याचे नाव आहे. राम शिरसाठ यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. 

30 जून 2010 रोजी ही घटना घडली. फिर्यादी हे पीएमपीमध्ये प्रसन्न ट्रॅव्हल्स मार्फत चालक म्हणून कार्यरत होते.  मनपा ते वडगाव शेरी ड्युटीवर असताना कंडक्टरसह पॅसेंजर घेवून ते वडगावशेरी येथे गेले. तिथे पॅसेंजर सोडल्यानंतर पुन्हा पुणे मनपा येथे जाण्यासाठी ते निघाले होते. सायंकाळी पावणे पाच वाजता त्यांची बस वडगावशेरी दत्तमंदिरासमोर आली. तिथे आरोपीने अचानक बसच्या पुढील बाजूवर दगडफेक केली. त्यामध्ये बसची पुढील फुटली. फिर्यादी यांनी त्यांची बस बाजूला घेवून लोकांच्या मदतीने आरोपीला पकडले. त्यावेळी त्याने वाहक ढोले यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांची ट्रे मधील तिकिटे ओढाताणीमध्ये फाटली गेली. पोलिसांनी तिथे येवून आरोपी सादकला ताब्यात घेतले. तपास अधिकारी प्रल्हाद होळकर यांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी वकील वामन कोळी यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्याला एक वर्षाची शिक्षा सुनावताना महत्वपूर्ण निरीक्षण नोंदविले.