होमपेज › Pune › पुणे : वानवडीत पावती फाटली, प्लास्टिक वापरणार्‍या बेकरीला दंड 

पुणे : वानवडीत पावती फाटली, प्लास्टिक वापरणार्‍या बेकरीला दंड 

Published On: Jun 23 2018 3:24PM | Last Updated: Jun 23 2018 3:24PMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने आजपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिक वापराच्या जनजागृतीची मुदत संपल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईअंतर्गत वानवडी येथील एका बेकरीमध्ये प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याचे निदर्शनास येताच बेकरीकडून ५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. 

राज्य शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर १८ मार्चच्या अद्यादेशाद्वारे राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. त्यापूर्वी महापालिकेकडून शहरात ५० मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर कारवाई केली जात होती. 

राज्य शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदी जाहीर केलेल्या तारखेपासून पुढील तीन महिने प्लास्टीक न विकण्यासंबंधी आणि न वापरण्यासंबंधी व्यवसायिक तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. मोहिमेनंतर त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल, असे शासनाने जाहीर केले होते. 

त्यानुसार पालिकेने शहरातील विविध भागांमध्ये पथनाट्य, प्लास्टिकचे वाईट परिणाम सांगणारी व्याख्याने, माहितीपत्रके यांचे वाटप केले. नागरिकांनी तसेच विक्रेत्यांनी त्याच्याकडे असलेला प्लास्टिकचा साठा पालिकेकडे जमा करावा, असे आवाहन पालिकेने करत १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कक्ष देखील सुरु केले होते. मात्र पालिकेने केलेल्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य सरकारने जनजागृतीसाठी आणि जवळ असलेल्या प्लास्टिकच्या वेल्हेवाट लावण्यासाठी दिलेली मुदत संपल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने शनिवारी शहरात कारवाईची मोहीम हाती घेतली. 

या मोहिमेत पालिकेच्या घनकचरा विभागाच्या पथकाने वानवडी येथील एका बेकरीवर प्लास्टिक पिशवी वापरल्याप्रकरणी ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. या प्रकारची कारवाई शहरात आणखी तिव्र केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.