Sat, Apr 20, 2019 17:50होमपेज › Pune › प्राधिकरण बांधणार दहा हजार घरे 

प्राधिकरण बांधणार दहा हजार घरे 

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 12:42AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या वतीने शहरातील नागरिकांना जास्तीत-जास्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने प्रयत्न करावेत. गृहयोजनांचे कामे हाती घ्यावीत, अशा सूचना प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांना दिल्या.

प्राधिकरणाच्या वतीने सध्या वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक 30 आणि 32 मध्ये 792 घरांचा प्रकल्प सुरू आहे; तसेच मोशी येथील पेठ क्रमांक 12 मध्ये पाच हजार घरांच्या प्रकल्पासाठी प्रकल्प सल्लागार नेमण्यात आला आहे. यासाठी क्रिएशन इंजिनिअरिंग आणि सम्यक आर्किटेक्ट या दोन कंपन्यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे; तसेच पेठ क्रमांक चारमध्ये एक हजार घरांसाठी प्रकल्प सल्लागार नेमण्यात आला आहे. याशिवाय पेठ क्रमांक सहामध्येही गृहयोजनेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय आणखी काही पेठांमध्ये गृहयोजनांचे काम हाती घेण्यासाठी प्राधिकरणाकडून हालचाली सुरू आहेत. येत्या तीन वर्षांत शहरातील नागरिकांना दहा हजारांपेक्षा जास्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरण प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. अध्यक्ष दळवी यांनी प्राधिकरणाकडे असलेल्या रिकाम्या भूखंडांवर जास्तीत जास्त गृहयोजनांचे काम हाती घेण्याच्या सूचना प्राधिकरणाच्या बैठकीत दिल्या. प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी प्राधिकरणाच्या रिकाम्या भूखंडांवर जास्तीत जास्त घरे बांधण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या सूचनेप्रमाणे गृहयोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सांगितले.