Fri, Apr 26, 2019 01:31होमपेज › Pune › ‘सनबर्न’ आता बावधनला?

‘सनबर्न’ आता बावधनला?

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 12:32AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पाश्‍चात्त्य संस्कृतीने व्यापलेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलची धूम पिंपरी-चिंचवड शहरात होणार, हे गेल्या पाच महिन्यांपासूनच सुरू होते. मोशी येथे नागरिकांनी यास मोठा विरोध केला. त्यानंतर आयोजकांनी विमानतळ पोलिसांकडे परवानगी मागितली असता, तीही नाकारली. त्यानंतर आता आयोजकांनी बावधन येथील ऑक्सफर्ड ग्लोफ रिसॉर्टच्या आसपास पुणे ग्रामीण पोलिसांकडे परवानगी मागितलेली आहे. फेस्टिव्हलला अद्याप कोणतीच परवानगी नसताना मात्र याची तिकीट विक्री बेकायदेशीररीत्या जोरात सुरू आहे. 
रात्रीच्या वेळी एलईडीच्या लाईटच्या लखलखत्या प्रकाशात, डिस्को लाईटच्या आणि मोठमोठ्या ‘डीजे’च्या आवाजात सुरू असणारे पॉप संगीत आणि त्यावर थिरकणारी तरुणाई असे या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलचे स्वरूप असते. दारू, अमली पदार्थांचे सर्रास सेवन आणि त्यासाठी लागणार्‍या सर्व सुविधा, खाण्यासाठी स्नॅक्स आणि एकाच वेळी पॉप संगीताच्या तालावर आणि विदेशी मद्याच्या नशेत थिरकणारी लाखो तरुण-तरुणाई हेच खरे चित्र असणारा हा परदेशी फेस्टिव्हल शैक्षणिकनगरी, औद्योगिकनगरी, आयटी हब असणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे.

यंदाचा (2017) फेस्टिवल 28 ते 31 डिसेंबरदरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातच होणार, असे सोशल मीडियावर आयोजकांनी जाहीर केले आहे. यामुळे ऑनलाईन तिकीट विक्री झालेली आहे. हजारो रुपयांची तिकिटे असणार्‍या हा फेस्टिव्हलची तरुणांमध्ये उत्सुकता आहे. या फेस्टिव्हलसाठी वेगवेगळ्या प्रकारची तिकिटे  केली असून, काही तिकीट एक महिना अगोदरच संपलेली आहेत. कोणत्याही परवानगीशिवाय या फेस्टिव्हलची तिकीट विक्री सुरू आहे. फेस्टिव्हलला कोणत्याच प्रशासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. 

मोशीतील सेक्टर पाचमध्ये हा फेस्टिव्हल होणार असल्याचे सोशल मीडियावर घोषित करण्यात आले. साधू-संतांच्या देहू आणि आळंदीच्या मध्यवर्ती हा फेस्टिव्हल घेऊन संस्कृतीवर आघात करण्याचे काम सुरू असल्याने याला प्रचंड विरोध झाला. या ठिकाणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांनी आंदोलन केले. या ठिकाणी हा फेस्टिव्हल होऊ नये, परवानगी देऊ नये यासाठी मुख्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री, पोलिस प्रशासनाला पत्रव्यवहार केला. या विरोधानंतर आयोजकांनी विमानतळ पोलिसांकडे परवानगी मागितली; मात्र पुणे शहर पोलिसांनी यास परवनागी नाकारली.

कोणतीही परवानगी नसताना, ठिकाणाचा पत्ता नसताना  तिकीट विक्री झाली. शहरात हा फेस्टिव्हल होणार असल्याचे घोषित केल्याने आणि सध्या परवानगी मिळत नसल्याने आयोजकांची धांदल उडाली आहे. आयोजकांनी आता या फेस्टिव्हलचा घाट बावधनच्या दिशेने घातला आहे.