Sat, Jul 20, 2019 21:21होमपेज › Pune › स्वीडनच्या मदतीने पिंपरी ‘स्मार्ट’ करणार

स्वीडनच्या मदतीने पिंपरी ‘स्मार्ट’ करणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

स्वीडन देशातील ‘ग्रीन सिटी’ म्हणजे ‘स्मार्ट सिटी’प्रमाणे पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करण्यात येणार आहे. यासंदर्भातील करार पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.27) सांगितले. 

स्वीडन देशातील ‘स्मार्ट सिटी’ अभ्यास दौर्‍यावरून हर्डीकर सोमवारी महापालिकेत रुजू झाले. दौर्‍यासंदर्भात माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, स्वीडन देशातील स्टॉकहोम, गॉथेनबॅग, एक्सकुलीटुंगा या ‘ग्रीन सिटीं’ना भेट दिली. या शहरात विशेषतः स्टॉकहोम शहरात घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांचे एकत्रित असलेले ‘सायन्स पार्क’, सोलर एनर्जी  आदी बाबी उल्लेखनीय आहेत. 

पर्यटनाला चालना देण्यासाठी स्टॉकहोम शहरात तब्बल 27 संग्रहालये आहेत. तसेच, 450 हेक्टर जागेत उद्यान व वन विकसित केले आहे. या शहराची लोकसंख्या 12 लाख आहे. नैसर्गिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य कायम ठेवून शहराचा विकास केला गेला आहे. पुनर्प्रक्रिया करून वस्तूंची विक्री करणारे शॉपिंग मॉल हा अधिक लक्षणीय उपक्रम आहे. कचर्‍यातील आणि सोडून दिलेल्या वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करून तयार केलेल्या वस्तू येथे विक्रीस ठेवल्या आहेत. 

‘ग्रीन सिटी’साठी कर्जरोखे विक्रीतून भांडवल निर्माण करणारा हा पहिला देश असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तेथील बसेस इलेक्ट्रिक इंधनावरील असल्याने ठिकठिकाणी इलेक्ट्रिक इंधन पॉइंट आहेत.  येथील बहुतांश आर्थिक व्यवहार हे डिजिटल पद्धतीने होतात. सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जुन्या शहरात वाहनांचा वापर कमी असून, पायी फिरण्यावर भर दिला जातो. वाहनतळाचे शुल्क अधिक आहे. येथे उत्पादन केले जात नसल्याने प्रदूषण नाही. नागरिक रस्त्यावर कचरा टाकत नसल्याने सफाई कामगार दिसत नाहीत. 

त्या शहराप्रमाणे काही उपक्रम आपल्या शहरात राबविण्याचा विचार आहे. नागरिकांचे सहकार्य आणि पाठबळ लाभल्यास ते यशस्वी होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.