होमपेज › Pune › स्मार्ट सिटीत मोकाट कुत्री,  डुकरे झाली उदंड

स्मार्ट सिटीत मोकाट कुत्री,  डुकरे झाली उदंड

Published On: Aug 20 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 1:11AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत मोकाट कुत्री व डुकरांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांकडून नागरिकांवरील हल्ल्याचा घटना वाढत आहेत; तर डुकरांमुळे कचरा कुंडीशेजारी घाण पसरून परिसरात अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, नागरिक हैराण झाले आहेत.


शहरातील खाद्यपदार्थाचे अनधिकृत स्टॉल तसेच, हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेले खरकटे व शिळे अन्नपदार्थांची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावली जात नाही. ते थेट कचरा कुंडीत टाकले जाते. ‘हॉटेल वेस्ट’ कचराकुंडीत टाकण्याचे प्रकार रात्री अकरानंतर शहरात सर्वत्र पाहावयास मिळतात. त्या अन्नपदार्थावर मोकाट कुत्री व डुकरांची पैदास झपाट्याने वाटत आहे.

ही मोकाट कुत्री रात्रीच्या वेळी नागरिकांवर हल्ला करतात. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. विशेषत: पादचारी, दुचाकी व सायकलस्वारावरही कुत्री हल्ला करतात.  तसेच, कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिला व बालकांचे चावे घेतल्याचे प्रकार घडत आहेत. एका ठिकाणी 10 ते 15 कुत्री फिरत दिसून येतात. 

कचराकुंडीभोवती पडलेल्या कचर्‍यामुळे डुकरांची पैदासही वाढत आहे. कुंडीबाहेर टाकलेल्या कचर्‍यावर डुकरे अक्षरशः तुटून पडतात. त्यामुळे अस्वच्छता वाढत आहे. पावसामुळे होणार्‍या चिखलामुळे त्यात भर पडत आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधी वाढली आहे. तसेच, पालिकेतर्फे दररोज कुंड्या साफ केल्या जात नसल्याने कचरा तुबूंन परिसरात पसरतो. नागरिकही कुंडीबाहेर कचरा टाकून अस्वच्छतेला एकप्रकारे प्रोत्साहन देत आहेत. या मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी स्थायी समिती सदस्यांनी नुकत्याच झालेल्या सभेत केली आहे. मोकाट कुत्री व डुकरांची संख्या स्मार्ट सिटीसाठी धोकादायक असून, त्यामुळे रोगराई वाढण्याचा धोका असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नसबंदी शस्त्रक्रिया केलेली कुत्री पुन्हा त्या जागेत आणून सोडू नयेत. त्याचा कायमचा बंदोबस्त करावा किंवा त्यासाठी स्वतंत्र शल्टर सुरू करावे. मोकाट जनावरे पकडण्याबाबत असलेल्या नियमावलीची सविस्तर माहिती पुढील सभेत देण्याचा सूचना आयुक्तांना देण्यात आल्या.