होमपेज › Pune › पिंपरीत चार तास रास्ता रोको; वाहनांची तोडफोड

पिंपरीत चार तास रास्ता रोको; वाहनांची तोडफोड

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 1:44AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरात उमटले. पिंपरी चौकात येणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणार्‍या वाहनांची तोडफोड करण्यात आली; तसेच पिंपरी चौकात सुमारे चार तास ‘रास्ता रोको’ करून निषेध नोंदवण्यात आला. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी ‘रास्ता रोको’ केला. चौकात ठिय्या मांडून निषेध नोंदवला; तसेच या घटनेची तक्रार पिंपरी पोलिस ठाण्यात नोंदवून घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे पिंपरी पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर हळूहळू जमाव पांगला आणि वाहतूक सुरू झाली. पिंपरीच्या विशाल टॉकिजमधील चित्रपटाचा खेळ जमावाकडून बंद  पाडण्यात आला.

मोरवाडी चौकाजवळ दोन एसटी बसेस जमावाने अडवून ठेवल्या; परंतु पोलिस वेळेत आल्याने, पुढचा अनर्थ टळला. त्या पुण्याकडे मार्गस्थ करण्यात आल्या. जमावाने पिंपरी पुलाकडून चौकाकडे येणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणार्‍या वाहनांची तोडफोड केली. या वेळी पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. काही वेळाने चौकात ‘रास्ता रोको’ व घोषणाबाजीही करण्यात आली. व्यापार्‍यांना दुकाने बंद करायला लावली. पोलिस अधिकार्‍यांनी सर्व गटांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले, त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली.