Wed, May 22, 2019 21:13होमपेज › Pune › भाजपांतर्गत वादामुळे पिंपरीत आमदारकीला चुरस

भाजपांतर्गत वादामुळे पिंपरीत आमदारकीला चुरस

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 31 2018 2:06AMपिंपरी ः नंदकुमार सातुर्डेकर 

शिस्तबद्ध पक्ष अशी एकेकाळी प्रतिमा असलेल्या भाजपामध्ये खासदार अमर साबळे व पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे पिंपरी मतदारसंघात विधानसभेला  जोरदार चुरस होणार हे स्पष्ट झाले आहे 

महापालिकेत समाविष्ट गावांसाठी 425 कोटींच्या विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी व सेनेने केला. यापाठोपाठ भाजपा खासदार अमर साबळे यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले, त्यामुळे संतप्त झालेल्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी साबळेंवर तोफ डागली. ‘मी आमदारकीची दावेदार असल्याने व त्यांना आपल्या मुलीला उभे करावयाचे असल्याने त्यांना पोटशूळ उठलाय,’ अशी टीका त्यांनी केली. खा. साबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ चारित्र्य व स्वच्छ कारभारामुळेच केंद्र व राज्यात भाजपा सरकार स्थिर आहे. 425 कोटींच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे, असे सांगत भूमिका स्पष्ट केली; मात्र साबळे व सावळे यांच्यात रंगलेल्या या युद्धामुळे या वेळीही विधानसभेला पिंपरीत चुरस होणार हे स्पष्ट झाले आहे.

सन 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत सेना-भाजपा युती होती. सेनेने पिंपरी मतदारसंघावर दावा सांगितला त्या वेळी सेनेत असलेल्या सीमा सावळे यांनी जोरदार तयारी केली; मात्र भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपले समर्थक अमर साबळे यांच्यासाठी हा मतदारसंघ मागून घेतला; मात्र राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांनी साबळे यांचा 9 हजार 438 मतांनी पराभव केला. बनसोडे यांना 60,970, तर साबळे यांना 51,502 मते मिळाली. आरपीआय (आठवले गट)च्या चंद्रकांता सोनकांबळे यांना 11,135, तर जनता दल धर्मनिरपेक्षचे मानव कांबळे याना 8240 मते मिळाली.सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नाट्यमय घटना घडल्या. पिंपरीतून काँग्रेसतर्फे गौतम चाबुकस्वार इच्छुक होते; मात्र सेनेच्या तिकिटासाठी त्या वेळी प्रयत्नात असलेल्या सीमा सावळे यांचा पत्ता कट करण्यासाठी सेनेचे खा.  श्रीरंग बारणे व त्या वेळी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी राजकीय खेळी केली. चाबुकस्वार यांना मातोश्रीचे दर्शन घडवून आणले आणि सेनेने चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली.

दरम्यानच्या काळात भाऊसाहेब भोईर यांनी काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पानसरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबा तापकीर, माजी विरोधी पक्षनेते दत्ता वाघेरे यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश झाला. भाजपा-आरपीआयच्या जागावाटपात मतदारसंघ चंद्रकांता सोनकांबळे यांच्या रूपाने आरपीआय (आठवले)ला गेला.  निवडणुकीत विजयाच्या फाजील आत्मविश्वासमुळे राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांना सेनेच्या गौतम चाबुकस्वार यांच्याकडून अवघ्या 2235 मतांनी पराभूत व्हावे लागले. चाबुकस्वारांना   51096, तर बनसोडे यांना 48761 मते मिळाली. सोनकांबळेंना 47288, तर काँग्रेसचे मनोज कांबळे यांना 11022 मते मिळाली. गेल्या काही काळात पुलाखालून बरेच पाणी  गेले. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सीमा सावळे आज भाजपात आहेत. पालिका निवडणुकीत भाजपाने 128 पैकी 77 जागा जिंकून बहुमत मिळविले. पिंपरीतून भाजपाच्या तिकिटासाठी वेणू अमर  साबळे, सीमा सावळे, अमित गोरखे यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. साबळे व सावळे यांच्यात जुंपली असताना ‘डार्क हॉर्स’ म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न गोरखे करत आहेत. निवडणुकीपर्यंत राजकारण काय रंग भरते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.