Wed, Jun 26, 2019 18:31होमपेज › Pune › शहरातील एकमेव ‘ई-टॉयलेट’ही गायब

शहरातील एकमेव ‘ई-टॉयलेट’ही गायब

Published On: Jun 20 2018 1:15AM | Last Updated: Jun 20 2018 12:23AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत प्रायोगिक तत्वावर अद्ययावत असे अ‍ॅटोमॅटीक ‘ई-टॉयलेट’ निगडी बस थांबा येथे 25 सप्टेंबर 2017 मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, ते टॉयलेटही नुकतेच गायब झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीत ‘ई-टॉयलेट’ योजना यशस्वी होणार की नाही, असा सवाल पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. या कृतीतून पालिका प्रशासनाकडून स्वच्छ भारत अभियानालाच केराची टोपली दाखविली जात असल्याचे  स्पष्ट होत आहे.  

पुण्यातील सॅमटेक क्लिन अ‍ॅण्ड केअर प्रा. लि. या खासगी कंपनीच्या सहकार्याने पालिकेच्या वतीने शहरातील 5 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ‘कॉईन कलेक्शन’ तत्वावर ई-टॉयलेट बसविण्याची संकल्पना होती. त्यास स्थायी समितीने मान्यताही दिली होती. निगडी बस थांबा येथे मोठा गाजावाजा करीत स्मार्ट सिटीतील पहिले ई-टॉयलेट सुरू करण्यात आले. जागेचा विचार करून ते टॉयलेट केवळ महिलांसाठी सुरू केले होते. त्यामध्ये सॅनिटरी नॅपकीन मशिनचीही सुुविधा होती. चिंचवड येथील एम्पायर इस्टेट, पिंपळे सौदागर, थेरगाव आदी चार ठिकाणी उर्वरित ई-टॉयलेट बसविण्यात येणार होते. मात्र, वर्ष उलटत आले तरी, अद्याप स्थापत्य व बीआरटीएस विभागाने जागा निश्‍चित करून न दिल्याने त्याचा पत्ता नाही. चारही ई-टॉयलेट वर्ष उलटत आले तरी, जागेअभावी सुरू करण्यात आलेले नाहीत. तर, निगडी बसथांबा येथील असलेला एकमेव ई-टॉयलेटही नुकताच गायब झाला आहे. त्यामुळे महिला वर्गांची कुंचबणा होत आहे. शहरातील एकमेव ई-टॉयलेट गायब झाल्याने पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहे. या उपक्रमात पालिकेस काहीच खर्च नव्हता. दुरूस्ती, देखभाल व सुरक्षेचा खर्च संबंधित खासगी कंपनीकडे आहे. तरीही या अत्यावश्यक योजनेला पालिका प्रशासन सहकार्य करीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. या कृतीतून पालिका प्रशासनाकडून स्वच्छ भारत अभियानालाच हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. 

शहरात बांधणार 100 ई-टॉयलेट-

मुंबईतील ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लॉयन्स ऑफ मुंबई इमेज’ ही स्वयंसेवी संस्था स्मार्ट सिटीत 100 ‘ई-टॉयलेट’ मोफत बांधून देणार आहे. टॉयलेटचा वापर नागरिकांना विनामुल्य करता येणार आहे. या निर्णयाला स्थायी समितीने 30 मे रोजी मंजुरी दिली आहे. संस्था टॉयलेट उभारणीचा खर्च ‘सीएसआर’ निधीद्वारे उभारणार आहे. टॉयलेटची उभारणी, त्याची देखभाल व दुरूस्ती तसेच, स्वच्छता, सुरक्षा, वीज बिलाचा खर्च संस्था 15 वर्षे  करणार आहे. पालिका ज्या-ज्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल, त्या-त्या ठिकाणी संस्था टॉयलेट बांधून देणार आहे. टॉयलेट दुरूस्ती, देखभाल, स्वच्छता आदी खर्च संस्था जाहिरातीच्या उत्पन्नातून मिळविणार आहे. मागील 5 ई-टॉयलेटची योजनेला पालिका प्रशासनाने सहकार्य न केल्याने ती पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यात या नव्या योजनेला प्रशासनाचा कितीपत प्रतिसाद मिळणार यावर शंका उपस्थित केली जात आहे.