Fri, Jan 18, 2019 21:57होमपेज › Pune › आकुर्डीत पालिका उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह

आकुर्डीत पालिका उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 12:24AM

बुकमार्क करा

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राची इमारत मोडकळीस आली असून, महापालिकेने ही इमारत पाडून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सीमाभिंत बांधण्याचे 22 लाखाचे टेंडर काढण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उभारले. या  इमारतीत पालिकेचे विभागीय कार्यालय होते.  करसंकलन, पाणीपट्टी या ठिकाणी स्वीकारली जात होती. हे कार्यालय गंगानगर-आकुर्डी येथे हलविण्यात आले, तेव्हापासून या इमारतीच्या देखभालीकडे  पालिकेचे  दुर्लक्ष झाले. परिणामी, सांस्कृतिक केंद्राच्या या इमारतीची वापराअभावी दुरवस्था झाली. प्रवेशद्वारावरच दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. कोनशिला, आवारातील फरशा, खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत, छताचे पत्रे निघाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राची दुरवस्था पाहून ही इमारत पाडून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक प्रमोद कुटे व आमदार अ‍ॅड.   गौतम चाबुकस्वार यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन केली. आमदार निधीतून पैसे उपलब्ध करून देण्याची तयारीही चाबुकस्वार यांनी दर्शवली.

पिंपरी-चिंचवड  महापालिकेने या पत्राची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राच्या  इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यानंतर ही जुनी इमारत पाडून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. अंदाजपत्रक, आराखडे करण्याचे काम सुरू करण्यात आले. सध्याचे बांधकाम 4 हजार 753 चौरस फूट आहे. 

नव्याने बांधकामाचे नियोजन केल्यावर त्यास बांधकाम विभागाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात आरसीसी सीमाभिंत बांधण्यात येत आहे. त्यासाठी 22 लाखांचे टेंडर काढण्यात आले आहे. इमारत पाडून नवीन इमारतीच्या बांधकामास चार महिने लागणार आहेत. त्यानंतर वर्षभरात बांधकाम पूर्ण होईल, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. या इमारतीत खाली पार्किंग व वर सभागृह असणार आहे. सध्या पालिकेच्या खर्चाने सामाजिक सभागृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र यापुढील कामासाठी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या आमदार निधीतून निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा पालिकेकडून व्यक्त केली जात आहे.