Mon, Aug 19, 2019 07:08होमपेज › Pune › पिंपरी पालिकेत बुके,श्रीफळ,शाल खरेदी,डायरी छापणे बंद

पिंपरी पालिकेत बुके,श्रीफळ,शाल खरेदी,डायरी छापणे बंद

Published On: Apr 26 2018 5:19PM | Last Updated: Apr 26 2018 5:19PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दरवर्षी विविध कार्यक्रमामध्ये मान्यवरांना सत्कारा वेळी देण्यात येणार्‍या बुके, श्रीफळ व शाल यासारख्या खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमांमध्ये देण्यात येणार्‍या या वंस्‍तूवर होणार्‍या लाखोंच्या खर्चास स्थायी समितीने पायबंद घातला आहे. तसेच, दरवर्षी छापण्यात येणारी डायरी (दैनंदिनी) या पुढे न छापण्याचा निर्णयही  घेतला आहे. त्यामुळे पालिकेचे दरवर्षी लाखो रूपयांची बचत होणार असल्याचा दावा समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांनी केला आहे.

समितीची सभा बुधवारी (दि.२५) रोजी झाली. पालिकेच्या विविध कार्यक्रमासाठी बुके, फुले, शाल व श्रीफळ यांची खरेदी केली जाते. त्यासाठी गेल्या एका वर्षात तब्बल २५ लाख रूपये खर्च झाला. सत्कारात दिलेले फुले व बुके दुसर्‍या दिवशी कचर्‍यात पडतात. स्वच्छ अभियानाच्या विरूद्ध हा प्रकार आहे. त्यामुळे यापुढे सत्कारासाठी बुके, फुले, शाल व श्रीफळ न वापरण्याचा निर्णय स्थायीने घेतला आहे. त्याऐवजी उद्यान विभागाच्या नर्सरीतील रोपे किंवा उपयोगी पुस्तके भेट देण्याची सूचना समितीने प्रशासनाला केली आहे. 

तसेच, पालिकेतर्फे दरवर्षी डायरी छापली जाते. त्यासाठी यंदा १० लाख रूपये खर्च झाला. डायरी छापणे बंद करून केवळ ‘पॉकेट डायरी’ छापण्याचा निर्णय समितीने घेतला. त्याचबरोबर वृक्ष प्राधिकरण समितीचा सिक्कीम दौरा आणि महिला व बाल कल्यार समितीचा  केरळ दौरा रद्दचा निर्णय समितीने घेतला. या दौर्‍यासाठी अनुक्रमे ९ लाख ५३ हजार आणि ३ लाख ३७ हजार ८६० असा एकूण १२ लाख ९० हजार ८६० रूपये खर्च होता. त्यात बचत झाली आहे. 

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिकेतील वायफळ खर्च थांबवून त्यात बचत करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पदाधिकार्‍यांकडून तशी अंमलबजावणी केली जात आहे, असे अध्यक्षा गायकवाड व सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले. समितीने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.