Tue, Jul 23, 2019 11:41होमपेज › Pune › आ. लांडगे यांचे कार्यालय बनले ‘हायटेक’

आ. लांडगे यांचे कार्यालय बनले ‘हायटेक’

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 12:51AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

भाजपच्या ‘डिजिटल इंडिया’त या पक्षाचे  भोसरी मतदारसंघाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचे जनसंपर्क कार्यालय त्याला साजेसे असेच ‘हायटेक’ व ‘कॉर्पोरेट’ बनविण्यात आले आहे. तेथे तरुण स्टाफच्या मदतीला निवृत्त सरकारी अधिकार्‍यांची विशेष टीम देण्यात आली आहे. भोसरीतील नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविता याव्यात यासाठी ‘परिवर्तन’ ही हेल्पलाईनही सुरू केली आहे. त्यामुळे रहिवाशांना जनसंपर्क कार्यालयात न जाता घरबसल्या तक्रार देणे शक्य झाले आहे. त्याद्वारे गेल्या तीन वर्षांत रहिवाशांच्या हजारो तक्रारींचे घरबसल्या निवारण झाले आहे, तर  ‘परिवर्तन’ला  आएसओ मानांकन प्राप्त आहे.   

भोसरी येथील शितलबाग परिसरात पुणे-नाशिक महामार्गालगत आमदार  लांडगे यांचे हे जनसंपर्क कार्यालय आहे. तेथे समस्यानिहाय नऊ विभाग केले गेले आहेत. प्रत्येक विभागाची जबाबदारी एकेका सुशिक्षित तरुणाकडे देण्यात आली आहे. आ. लांडगे  पंधरवड्यातून एकदा त्यांची बैठक घेतात.

 जनसंपर्कासाठी नेमण्यात आलेल्या स्टाफच्या जोडीला एक विशेष टीम आहे. त्यात निवृत्त प्रशासकीय अधिकारी, विधान भवन, मंत्रालयात काम केलेले माजी अधिकारी, महिला संघटक, सल्लागार यांचा समावेश आहे. ते बॅक ऑफिस सांभाळतात. ते कार्यालयातील स्टाफला सूचना देतात. त्यांच्या कामाचे नियोजन करतात. त्याद्वारे निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ ठेवले जाते. आमदार लांडगे यांचे लहान बंधू आणि उद्योजक कार्तिक लांडगे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण जनसंपर्क कार्यालयाचे कामकाज चालते. 

भोसरी मतदारसंघामध्ये शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, मतदारसंघातील विविध प्रश्‍न सोडविणे, महिला व युवकांचे संघटन, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे, विविध अभिनव योजना राबविणे आदी कामे या कार्यालयामार्फत केली जातात.

नोकरीविषयक एचआर विभाग कार्यरत आहे. विशेष म्हणजे, भोसरी मतदारसंघातील प्रत्येक प्रभागनिहाय एका आमदार कार्यालय स्वयंसेवकाची नियुक्ती केली आहे. त्याद्वारे त्या त्या विभागातील समस्यांचे निराकरण केले जाते. 

कार्यालयात मंत्रालयासंबंधी कामकाज, महापालिकासंबंधी कामकाज, नोकरीविषयक सल्ला विभाग, सामाजिक संस्था संघटना समन्वय, नगरसेवक समन्वय समिती, आरोग्यविषयक विभाग, शैक्षणिक योजना विभाग, नागरी समस्या निराकरण, महिला समस्या निराकरण विभाग असे विभाग केले गेले आहेत. त्यामुळे समस्यांचा निपटारा खूप चांगल्या पद्धतीने होत असल्याचे कार्तिक लांडगे यांनी सांगितले.