Fri, Apr 26, 2019 19:27होमपेज › Pune › क्रीडा विभाग कार्यालयाचे स्थलांतर रखडले

क्रीडा विभाग कार्यालयाचे स्थलांतर रखडले

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 12:27AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

दीड वर्षापूर्वी अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील प्रशासकीय इमारत ‘स्ट्रक्चरल ऑडिट’मध्ये धोकादायक ठरविली होती.  त्याअनुषंगाने क्रीडा विभाग कार्यालयाचे स्थलांतराचा विषय समोर आला होता. त्याअनुषंगाने सावित्रीबाई फुले इमारतीमध्ये स्थलांतरच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत; मात्र ते काही तांत्रिक कारणामुळे अडकले आहे, त्यामुळे स्थलांतर होणार की नाही यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कामगार कल्याण मंडळाने कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम ही इमारत 1975 मध्ये उभी केली होती. सध्या या इमारतीमध्ये पालिकेचे क्रीडा प्रशासन कार्यालय, क्रीडा ग्रंथालय, भोसरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे कार्यालय कार्यान्वित आहे. या इमारतीचे पालिकेच्या वतीने 2015 मध्ये ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर 11 एप्रिल 2016 मध्ये स्थापत्य विभागाने ही इमारत ‘धोकादायक’ आहे म्हणून तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांना कळविले होते. या ठिकाणी काम करणे धोकादायक आहे, त्यामुळे क्रीडा विभाग कार्यालयाचे स्थलांतर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत त्याबाबत बैठकही घेण्यात आली होती. क्रीडा विभागाच्या ग्रंथालयामध्ये असणारी पुस्तके सर्वगुणसंपन्न आहेत; परंतु शहराच्या दृष्टीने अण्णासाहेब मगर स्टेडियममधील ग्रंथालय दूर पडत असल्यामुळे या ठिकाणी क्रीडाप्रेमी येण्याचे टाळत असल्याचे समोर येत आहे. या उत्कृष्ट क्रीडा ग्रंथालयाचा उपयोग व्हायचा असेल, तर ते मध्यवर्ती ठिकाणी होणे आवश्यक आहे, असा मतप्रवाह समोर येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इमारत अनेक ठिकाणी पूर्णपणे निकामी झालेच्याही दिसत आहे. दीड महिन्यापूर्वी क्रीडा कार्यालयात घोणस शिरली होती. ती बाहेर गेली का नाही हे आजपर्यंत कोणालाही माहिती नसल्यामुळे या ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील क्रीडा प्रशासन कार्यालय व क्रीडा ग्रंथालयाचे स्थलांतर होणे आवश्यक असल्याची चर्चा कर्मचारी वर्गात आहे.