Sat, Jun 06, 2020 09:01होमपेज › Pune › ख्रिसमससाठी बाजारपेठ सजली

ख्रिसमससाठी बाजारपेठ सजली

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 12:19AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

येत्या 25 डिसेंबरला साजर्‍या करण्यात येणार्‍या नाताळ सणासाठी शहरातील दुकाने सजली असून, ख्रिस्ती बांधवांच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. ख्रिसमससाठी लागणार्‍या आकर्षक वस्तूंनी शहरातील दुकाने सजली असून, वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. 

शहरातील ख्रिश्‍चन बांधव नाताळचा सण दर वर्षी उत्साहात साजरा करतात; तसेच घरांवर व चर्चला आकर्षक विद्युतरोषणाई करतात. ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर  घरासमोरच्या अंगणात ख्रिस्तजन्माचा आकर्षक देखावा उभारला जातो. दापोडी येथील विनीयार्ड चर्चमध्येही सध्या ख्रिसमसची तयारी सुरू असून, इतर धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. ख्रिसमस जवळ येऊन ठेपल्याने ख्रिस्ती बांधवांची  लगबग वाढली आहे; तसेच यानिमित्त ख्रिस्ती बांधवांमध्ये चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण असून, जो तो आपापल्या परीने सण साजरा करण्यासाठी तयारी करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक कपडे खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

लहान मुलांचे खास आकर्षण म्हणजे सांताक्लॉज. या सांताक्लॉजच्या टोप्या शहरात विक्रीस आल्या असून, पदपथांवर व शहरातील विविध भागात टोपी विक्रेत्यांनी रस्त्यांच्या कडेला दुकाने थाटली आहेत.  ग्राहकही टोपी खरेदीसाठी गर्दी करत असून, आकर्षक टोप्यांची खरेदी केली जात आहे. सजावटीसाठी आवश्यक शो-पीस; तसेच शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जात आहे. ख्रिस्ती बांधवांसाठी या सणाचे विशेष महत्त्व असल्याने आकर्षक सजावटीसाठी लागणार्‍या साहित्य खरेदीसाठी महिलांची झुंबड उडत आहे. महागाईचा फटका या वर्षीही नागरिकांना बसला असून, साहित्य खरेदीवर मात्र याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.