Thu, Apr 25, 2019 23:26होमपेज › Pune › लेकरांना पोटभर जेवू घालून मग घोटला गळा

लेकरांना पोटभर जेवू घालून मग घोटला गळा

Published On: Aug 20 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 1:09AMपिंपरी : प्रतिनिधी 

ताथवडे येथे पोटच्या दोन मुलांचा गळा घोटून बापाने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 18) समोर आली. मुलांच्या शवविच्छेदनामध्ये त्यांच्या पोटात जास्त प्रमाणात अन्न असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बापाने मुलांना पोटभर जेवू घालून मग गळा घोटला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. 

शुभम (10) आणि रुपम (8) या मुलांचा खून करून दीपक बरमन (35) या बापाने आत्महत्या केली आहे. शेजार्‍यांच्या माहितीनुसार दीपकचे त्याच्या मुलांवर जिवापाड प्रेम होते. दीपक कधीही मुलांना चापटदेखील मारत नव्हता. आईपेक्षा बापाकडेच मुले जास्त रमत होती. त्यामुळे दीपकने केलेल्या कृत्याचा सर्वांना धक्का बसला आहे. 

पोलिसांनी मयत दीपकवर दोन मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दीपकची पत्नी मालतीकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्यात कसलाही वाद नसल्याचे तिने सांगितले. मात्र, दीपकचा स्वभाव अतिशय तापट होता, असेही तिच्याकडून सांगण्यात येत आहे.  रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत नातेवाईक आले नसल्याने दीपक आणि मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. पोलिस घटनेच्या सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. 

पोलिस तपासात काहीतरी धक्कादायक वास्तव समोर येण्याची शक्यता पोलिस वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.