Mon, Aug 19, 2019 18:46होमपेज › Pune › पालिकेतील सत्ता गेल्याचे राष्ट्रवादीला दुःख 

पालिकेतील सत्ता गेल्याचे राष्ट्रवादीला दुःख 

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:13AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनंतर्गत काळेवाडी येथे झालेल्या सभेत नेत्यांनी आपल्या मनातील व्यथांना वाट मोकळी करून दिली. विशेषतः  सत्तेत असताना शहरात विकासकामे करूनही जनतेने पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला नाकारले याची खंत प्रत्येकाच्या भाषणात होती. पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांमुळेच पक्षाची ही स्थिती झाल्याची चीड व संताप नेत्यांच्या मनात असल्याने आ. लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना लक्ष्य केले गेले.

लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीला गळती लागली आ. लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे असे दिग्गज बाहेर पडले. त्यामुळे पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता गमावावी लागली. त्याची खंत हल्लाबोल आंदोलनात व्यक्त झाली. विशेषतः आ.  लक्ष्मण जगताप व आ महेश लांडगे यांना लक्ष्य केले गेले.  माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आपले जे लोक तिकडे गेलेत त्यांना हाफ चड्डीची लाज वाटते म्हणून संघाने फुल चड्डी  करून घेतली. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या पोरं जगतात आई मेली तरी...संघटनाही जगेल गद्दार बाहेर गेले  तरी.. त्यांची घरवापसी होईल पण रांगेत उभे राहावे लागेल अडचणींच्या काळात पवारांना सोडून गेलेले आज कुठे आहेत पहा असा टोला खा. सुळे यांनी लगावला.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मुंडे म्हणाले की, लोकसभा विधानसभेला पक्ष सोडून जे बाहेर गेले, त्यांना हेराफेरी या चित्रपटातील ‘त्या’ दोघांची उपमा द्यावी लागेल. ये वक्त की हेराफेरी है वेळ बघून राष्ट्रवादीशी दगाबाजी केलेल्यांना घर वापसी नाही. त्यांना जनताच घरी बसवेल. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही पालिका निवडणुकीत जनतेने नाकारले याची खंतही प्रत्येकाने वेगळ्या शब्दात मांडली.  खा सुप्रिया सुळे म्हणाल्या, पिंपरी -चिंचवडची ओळख अजितदादांचा एरिया अशी आहे.  त्यांनी शहराचा विकास केला थोडसं काही दिसलं की दादा अधिकार्‍यांना ओरडायचे.  आज शहरातील कचरा बघून अजितदादा पालकमंत्री नाही हे लक्षात येत.  

ज्यांनी पिंपरी- चिंचवडसाठी इतकं केलं त्या अजित पवार यांना पालिका निवडणुकीतील पराभवाने किती दुःख झाले असेल आता आपल्याला काही द्यायची वेळ आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला भावपूर्ण साद घातली.  पिंपरी चिंचवडला गेलं की पद जाते असे कोणीतरी पसरवून ठेवले आहे.  पण या शहराने मला मोठे केले मी उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलो.  एखादेवेळी चूक होते जो काम करतो तोच चुकतो पण कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसण्यासाठी राष्ट्रवादीला ताकद द्या,  असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनंतर्गत झालेल्या या सभेस प्रचंड गर्दी होती.  मात्र या गर्दीचे रूपांतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतात होणार का हाच खरा प्रश्न आहे.

शिवसेनेवर टीका नाही

हल्लाबोल मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेनेला लक्ष्य केले आहे.  काळेवाडी येथील सभेत मात्र त्यांनी सेनेवर टीका करणे टाळले उलट सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत पिंपरी - चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढत आहे.  पोलीस स्टेशन ही हप्ते वसूल करणारी केंद्रे बनली आहेत.  या केलेल्या आरोपाची बातमी बारणे यांचे नाव न घेता पवार यांनी वाचून दाखवली त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.