Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Pune › अनधिकृत पोस्टर्समुळे शहराचे विद्रूपीकरण

अनधिकृत पोस्टर्समुळे शहराचे विद्रूपीकरण

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:20AM

बुकमार्क करा
पिंपरी : 

पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी चिकटविण्यात आलेल्या कागदी पोस्टर्समुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. शहरातील कोणतीच जागा कागदी पोस्टर्सवाल्यांनी वर्ज्य केलेली नाही. डीपी बॉक्स, शहरातील डांगे चौक उड्डाणपूल, भोसरी उड्डाणपूल, निगडी उड्डाणपूल या ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पीएमपी बस स्टॉप; तसेच बसवरही ही पोस्टर्स झळकत आहेत. शहर सुशोभीकरणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी महापालिकेने जी झाडे लावली आहेत त्या झाडांवरही कागदी पोस्टर्स लावण्यात आल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. पालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वछता मोहीम सुरू आहे. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर स्वतः या मोहिमेत सहभागी झाले आहेत. कर्मचार्‍यांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु, महापालिकेचे अधिकारी यावर कारवाई का करत नाहीत, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी उड्डाणपुलाखाली भिंतींवर व पिलरवर, सार्वजनिक भिंतींवर, विद्युत डीपी बॉक्सवर, दुभाजकांवर, तर सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या झाडांवर देखील अनधिकृत कागदी फलक चिकटविण्यात आले आहेत. यावर प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही, त्यामुळे शहर विद्रूपीकरणात वाढ होताना दिसत आहे.