Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Pune › पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पोलिस आयुक्तालयाचे कामकाज सुरु

अखेर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा कारभार सुरु

Published On: Aug 15 2018 5:32PM | Last Updated: Aug 15 2018 8:21PMपिंपरी : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय  कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आयुक्तालयाचा कारभार सुरु करण्यात आला.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे,  अॅड. गौतम चाबुकस्वार, महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

आयुक्तालयाचे कामकाज प्रेमलोक पार्क येथील इमारतीमधून चालणार आहे. मात्र इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने ऑटो क्लस्टर येथे तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडून ३२९ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी (दि. १४)काढले. पुणे ग्रामीण पोलिसांकडून वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ३४  सहाय्यक पोलिस फौजदार, ७९  पोलिस हवालदार आणि २१६  पोलिस नाईक, पोलिस शिपाई, यांचा समावेश आहे. तसेच पुणे आयुक्तालयातून १ सहायक आयुक्त, २६ पोलिस निरीक्षक, १८ सहायक पोलिस निरीक्षक, ७० उपनिरीक्षक वर्ग करण्यात आले आहेत.

पक्षाने दिलेला शब्द पाळला

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरु करू असा शब्द आम्ही पिंपरी चिंचवडकरांना दिला होता. तो शब्द भाजपा सरकराने पाळला असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, आयुक्तालायामुळे शहरातील समान्य नागरिक सुरक्षित झाला आहे.  

झोपेत धोंडा घातला

पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रात काम करत असलेल्या ३२ सहायक निरीक्षक आणि ८ उपनिरीक्षकांना पुणे आयुक्तालयात वर्ग करण्यात करण्याचे आदेश मध्यरात्री देण्यात आले. यामध्ये बहुतांश तपास पथकातील तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहाटे हातात आदेश येऊन पडल्याने अधिकाऱ्यांना हालचाल करण्यास संधी मिळाली नाही. त्यामुळे झोपेते धोंडा घातला अशा प्रतिक्रिया 'त्या' अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत.