Tue, Mar 26, 2019 08:21होमपेज › Pune › आठ महिन्यांत ‘धन्वंतरी’ची 18 कोटींची बिले

आठ महिन्यांत ‘धन्वंतरी’ची 18 कोटींची बिले

Published On: Jan 15 2018 1:43AM | Last Updated: Jan 15 2018 1:43AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना धन्वंतरी स्वास्थ योजनेअंतर्गत शहरातील खासगी रूग्णालयात वैद्यकीय उपचार मोफत दिले जातात. या योजनेत केवळ 8 महिन्यांत एकूण 5 हजार 804 जणांनी लाभ घेतला असून, त्यांचे एकूण बिल तब्बल 18 कोटी 32 लाख 87 हजार 997 रूपये इतके भरमसाट झाले आहे. त्यावरून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील सेवेवर महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचाच भरोसा नसल्याचे धक्कादायक चित्रसमोर आले आहे.

महापालिकेने धन्वंतरी स्वास्थ योजना 1 सप्टेंबर 2015 पासून सुरू केली आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना त्याचा लाभ घेता येतो. त्यानुसार महापालिकेने मान्यता दिलेल्या खासगी रूग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. खासगी रूग्णालयाने केलेल्या उपचार व रूग्णसेवेचे बिल महापालिकेकडून अदा केले जाते. 

या योजनेत 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2017 या आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण 5 हजार 804 रूग्णांनी खासगी रूग्णालयात विविध आजारावर उपचार सेवा घेतली आहे. त्यांचा बिलाचा एकूण खर्च तब्बल 18 कोटी 32 लाख 87 हजार 997 रूपये इतका आहे.  त्यापैकी अद्याप 3 हजार 522 जणांची बिले अदा करणे प्रलंबित आहे. दरम्यान, महापालिकेने धन्वतंरी स्वास्थ योजना या लेखाशिर्षावर सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 10 कोटी रूपयांची तरतूद केली होती. त्यापैकी 20 डिसेंबर 2017पर्यंत 9 कोटी 94 लाख 77 हजार 584 रूपये इतकी रक्कम बिलापोटी अदा करण्यात आली आहे. आता केवळ 5 लाख 22 हजार 416 रूपये निधी शिल्लक आहे. 

या योजने अंतर्गत दरमहा प्राप्त होणारी अधिकारी व कर्मचारी वर्गणी आणि महापालिकेचा हिस्सा लक्षात घेता या योजनेसाठी तब्बल 19 कोटी रूपयांची वाढीव खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी शनिवारी (दि.20) होणार्‍या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे.