होमपेज › Pune › 425 कोटींच्या निविदा रद्द करा

425 कोटींच्या निविदा रद्द करा

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 12:26AM

बुकमार्क करा
पिंपरी-चिंचवड : जयंत जाधव 

‘रिंग’संदर्भात सर्वप्रथम ‘पुढारी’ने वृत्त देऊन वाचा फोडली होती.  शनिवारी (दि. 13) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने भाजप आणि आयुक्त हर्डीकर यांना लक्ष्य केले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला आघाडीच्या शहर संघटिका सुलभा उबाळे आदींनी भाजपच्या महापालिकेतील काराभाराचे वाभाडे काढले. एक वर्ष आम्ही गप्प बसलो व भाजपला कामाची संधी दिली; परंतु ते राष्ट्रवादीपेक्षाही अधिक वाईट पद्धतीने भ्रष्टाचार करत असल्याची टीका शिवसेनेच्या या नेत्यांनी केली. 

भाजपमध्ये राष्ट्रवादीचेच नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांना भ्रष्टाचार करण्याचा मोठा अनुभव आहे. सध्याच्या विरोधकातील राष्ट्रवादीला काय चालले आहे, हेच कळत नसल्याची टीका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. महापालिकेत 128 नगरसेवकांपैकी भाजपचे 77 व त्यांना पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक 5; तसेच यापूर्वीच्या सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेत 36 नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे 9 आणि मनसेचा 1 नगरसेवक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्या मानाने प्रबळ विरोधक आहे; परंतु ज्या प्रमाणात राष्ट्रवादीचा पालिकेतील भाजपाच्या गैरकारभावर विरोध व्हायला हवा, त्या प्रमाणात होताना दिसत नाही. त्यापेक्षा शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचे सध्या चित्र आहे.  

425 कोटींच्या कामांमध्ये 15 ते 20 टक्के जादा दराने निविदा स्वीकारल्या गेल्या आहेत. मागील दोन वर्षांच्या कामांच्या निविदा पाहता सदर ठेकेदारांनी 4 ते 5 टक्के जादा दराने निविदा भरल्या आहेत. रस्त्यांच्या कामांचे ‘एस्टीमेंट’ मुळात जादा दराने तयार करण्यात आले, तरीही ठराविक 12 ठेकेदारांना 15 ते 20 टक्के जादा दराने काम दिले गेले आहे. संबंधित ठेकेदारांनी ‘सपोर्टिंग’ निविदा भरली आहे. या कामासाठी 60 टक्के जागा अद्याप ताब्यात नाही. अर्थसंकल्पात या कामाच्या निधीची तरतूद नाही. असे असतानाही  त्यास मंजुरी देण्यामागे भ्रष्टाचार असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप खासदार आढळराव पाटील यांनी केला. या आरोपात तथ्य असून, याबाबतचे पुरावेच खा. आढळराव व कलाटे यांनी पत्रकार परिषदेत मांडले.  

राष्ट्रवादीला चोर म्हणून ओरडणारे भाजप आता दरोडेखोराच्या भूमिकेत आहेत, अशी टीका आढळराव यांनी केली. खा. आढळराव यांच्या टीकेत तथ्य असून, आयुक्त हर्डीकर यांनीही निविदांवर कुठलीही शेरेबाजी करून ठेकेदारांना पत्र देऊन दर कमी करण्याची मागणी न करता, एकाच दिवशी मंजुरी दिल्याने या कामात ‘रिंग’ व अधिक दर देऊन भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.  


विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवूनच रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या. धरणात मुबलक पाणी असताना कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठ्याची मोठी कामे करून घेण्यात आली. कचरा समस्या दाखवून मर्जीतील ठेकेदारांना काम देण्याचा कट भाजपाने केला आहे. भाजपाचा गैरकारभाराचा पोलखोल शिवसेना करणार आहे. प्रसंगी जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा खासदार बारणे यांनी दिला.  राज्य शासनाने सोलापूर, नवी मुंबई व पुण्याप्रमाणे या कामांचीही चौकशी करावी, अशी खा. बारणे यांनी केलेली मागणीही रास्त आहे.