Tue, Nov 13, 2018 22:20



होमपेज › Pune › आधी भूमिपूजन मग सल्लागार महापालिकेचा उलटा चष्मा

आधी भूमिपूजन मग सल्लागार महापालिकेचा उलटा चष्मा

Published On: May 23 2018 1:25AM | Last Updated: May 23 2018 12:17AM



पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे कोणत्याही कामासाठी सल्लागार नेमण्याची जणू प्रथा पडली आहे. पण आता त्याचा अतिरेक झाला आहे मोरवाडी येथे दिव्यांगासाठी बांधण्यात येणार्‍या कल्याणकारी केंद्राच्या कामाची अगोदर निविदा काढली. त्यानंतर भूमिपूजन करण्यात आले आणि आता काम कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाचा उरफाटा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकासकामे करताना कामाचा सल्ला घेण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली जाते. यासाठी पालिकेचे कोट्यावधी रुपये खर्च होतात. सल्लागार नियुक्तीवरुन सत्ताधार्‍यांवर  टीकेची झोड देखील उठते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत सल्लागारांच्या नेमणूका सुरुच आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 10 मधील मोरवाडी येथे नि:समर्थ (अपंग) साठी कल्याणकारी केंद्र बांधण्यात येणार आहे. 

शहरातील अपंगांसाठी बांधण्यात येणार्‍या अपंग केंद्रामध्ये तळमजल्यावर चारचाकी, दुचाकी व सायकल पार्किंग तसेच मुलांसाठी खेळण्याचा बगीचा व चौकीदार रूम असणार आहे. पहिल्या मजल्यावर 600 लोकांसाठी मल्टीपर्पज हॉल, स्वागत कक्ष, कार्यालय, जॉईन टिचिंग स्टाफ रूम, स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह व आउटरीच रूमची सुविधा असणार आहे. 

दुसर्‍या मजल्यावर अधिष्ठता केबिन, बहुअपंग क्लास रूम, गणित प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, ग्रंथालय, ब्रेन लिपी, संगीत रूम, व्यवसाय उपचार विभाग, चित्रकला वर्ग, हस्तकला, ई-लर्निंग कक्ष इत्यादी सुविधा असणार आहेत. तिसर्‍या  व चौथ्या मजल्यावर सुधार उद्देशक वर्ग, द्रुष्टी बाधित वर्ग, स्वमग्न वर्ग, बालवर्ग, टेलरिंग व ब्युटीशियन कोर्स वर्ग, व्यवसाय प्रशिक्षण श्रवण व वाचा, भौतिकोपचार व मानसोपचार विभाग आणि टेरेस वर पॅनल कव्हर इत्यादींची व्यवस्था असणार आहे. परंतु, या कामाचे नियोजन प्रशासनाकडून व्यवस्थित होताना दिसत नाही. 

या केंद्राचे काम देव कंन्स्टक्शन यांना 8 कोटी 6 लाख 72 हजार रुपयात दिले आहे. 18 महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत आहे. या केंद्राचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते 3 मे रोजी करण्यात आले. अगोदर भूमिपूजन केले जाते आणि त्यानंतर सल्लागार नेमला जात असल्यामुळे पालिका प्रशासनाचा उरफाटा कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे.

आज होणार्‍या स्थायीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी

भूमिपूजन झाल्यानंतर केंद्राचे काम कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार आहे. कल्याणकारी केंद्र बांधणे हे काम विशेष असल्याने तांत्रिक दृष्ट्या आराखड्याप्रमाणे काम करुन घेणे गरजेचे आहे. त्याचे मोजमाप घेऊन देयक तयार करणे, प्रकल्पाच्या दैनंदिन कामावर देखरेख करणे, निविदा पश्‍चात काम करणे यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी मे.के.बी.पी. सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निविदा पश्‍चात कामासाठी निविदा रकमेच्या 1.50 टक्के फी अदा करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव  बुधवारी (दि.23) होणार्‍या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.