Thu, Apr 25, 2019 03:55होमपेज › Pune › ‘स्मार्ट सिटी’ ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडणार

‘स्मार्ट सिटी’ ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडणार

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:37AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहे. या योजनेमुळे शहरातील वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वाहनतळ, बसथांबे आदींचा एकत्रित समन्वय साधत सेवा व सुविधा गतिमान केल्या जाणार आहेत. या कामासाठी खासगी एजन्सीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास ‘स्मार्ट सिटी’च्या संचालक मंडळाच्या शनिवारी (दि. 17) झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

महापालिकेत झालेल्या ‘स्मार्ट सिटी’च्या तिसर्‍या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष डॉ. नितीन करीर होते. या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा साळवे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे प्रतिनिधी म्हणून अशोक मोराळे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण, सहायक कार्यकारी अधिकारी लक्ष्मण कोल्हे आदी उपस्थित होते. 

 ‘स्मार्ट सिटी’च्या ‘पॅन सिटी’ प्रकल्पासाठी ईआरएनएसटी अ‍ॅण्ड यंग या संस्थेची आणि पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी या 1 हजार 135 किलोमीटर आकाराच्या भागातील एरिया बेस डेव्हल्पमेंट प्रकल्पासाठी केपीएमजी अ‍ॅडव्हाइसरी सर्व्हिस प्रा. लि. या संस्थेची सल्लागार (प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट) म्हणून नियुक्तीस मंजुरी देण्यात आली. 

‘स्मार्ट सिटी’च्या अर्थसंकल्पाचा नमुना निश्‍चित करण्यात आला. महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून त्यांना अतिरिक्त पदभार देण्यास मान्यता देण्यात आली. कंपनी कायद्यानुसार ‘जीएसटी’ व सर्व्हिस टॅक्सआकारणीबाबत चर्चा करण्यात आली. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंच्या जागी नयना गुंडे यांची नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्तीस मान्यता देण्यात आली. 

15 मार्चपर्यंत मिळणार केंद्राचा निधी
‘स्मार्ट सिटी’साठी केंद्राचा निधी 15 मार्चपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात ‘स्मार्ट सिटी’ अभियानाचे सहसचिव समीर शर्मा यांच्यासोबत चर्चा झाली आहे. ते येत्या 
मंगळवारी (दि.20) शहरास भेट देऊन चर्चाही करणार आहेत. प्राधिकरण ‘स्मार्ट सिटी’च्या कार्यालयासाठी भाडे आकारत असून, त्यांना कार्यालयासाठी भाडे न घेण्याबाबत चर्चा केली जात आहे, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांना सांगितले. 

तब्बल 750 कि.मी.  अंतराचे नेटवर्क जाळे
संपूर्ण शहरात सुमारे 750 किलोमीटर अंतराची ऑप्टीकल फायबर टाकून नेटवर्कने जोडण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात अद्ययावत दर्जाचे 600 सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत. शहरात 300 ठिकाणी मोफत वायफाय ठिकाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दहा ठिकाणी स्मार्ट वाहनतळ निर्माण केले जाणार आहेत. या नेटवर्कला महापालिकेसोबत वीज, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, पीएमपीएल, पाणीपुरवठा, तक्रार आदी विविध सेवा जोडण्यात येणार आहेत. या माध्यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. एलईडी जाहिरात फलक व एलईडी पथदिवे लावण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष या कामास एप्रिल महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुमारे 600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे नीलकंठ पोमण यांनी सांगितले. या संदर्भातील सादरीकरण बैठकीत करण्यात आले.