Sun, Mar 24, 2019 12:26होमपेज › Pune › एम्पायर इस्टेट पूल एप्रिल अखेर वाहतुकीस खुला होणार 

एम्पायर इस्टेट पूल एप्रिल अखेर वाहतुकीस खुला होणार 

Published On: Mar 06 2018 7:29PM | Last Updated: Mar 06 2018 7:29PM 
पिंपरी : प्रतिनिधी

चिंचवड येथील एम्पायर इस्टेटसमोरून जाणाऱ्या उड्डाण पूल एप्रिल अखेर वाहतुकीस खुला होण्याची शक्‍यता आहे. पुलाचे काम एप्रिल अखेर पूर्ण होण्याची शक्यता बीआरटीएस विभागाचे उपअभियंता तथा प्रवक्ता विजय भोजने यांनी व्यक्त केली.  

भोजने यांनी मंगळवारी पत्रकारांसमवेत पुलाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी ते  बोलत होते. पवना नदी, लोहमार्ग आणि जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडत शहरातील नागरिकांना पूर्वेकडून पश्चिमेकडे या दीड किलोमीटर लांबीच्या पुलावरून जाता येईल. काळेवाडी फाट्यापासून हा रस्ता सुरू होत आहे. या पुलावरून ऑटो क्लस्टरपर्यंत तसेच पुढे केएसबी चौक, चिखलीगावापर्यंत जाता येणार आहे. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरून वाहनांना आणि बीआरटीला स्वतंत्र मार्ग आहे. 

बीआरटी रस्ता आणि एम्पायर इस्टेटसमोरील पुलासाठी २१९ कोटी रूपये खर्च झाला आहे. या रस्त्याची लांबी १०.२५ किलोमीटर आहे. तर, रूंदी ४५ मीटर आहे. पुलाची लांबी १.६ किलोमीटर आहे. तर रूंदी ३१.२ मीटर एवढी आहे. जाधववाडी येथे या रस्त्याची रूंदी ३० मीटर तर कुदळवाडी येथे २४ मीटर एवढी आहे. बीआरटीसाठी स्वतंत्र डेडिकेटेड मार्ग आहे. त्यामुळे त्या दीड किलोमीटरच्या टप्प्यात हायब्रीड पद्धतीची बीआरटी असेल. त्या रस्त्यावर बीआरटी गाड्यांसोबत अन्य वाहनेही धावतील. बीआरटी प्रकल्पासाठी ८.५ कोटी रूपये खर्च झाला आहे.   
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता तसेच एम्पायर पूलाचे काम लवकरच पूर्ण होईल. पुलावरील वाहतुक एप्रिलमध्ये  सुरू  होईल.