Sat, Aug 17, 2019 16:12होमपेज › Pune › रस्ते विकासावर ‘स्थायी’ची कोटींची उड्डाणे

रस्ते विकासावर ‘स्थायी’ची कोटींची उड्डाणे

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:28AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चालू आर्थिक वर्षातही रस्ते विकासकामांना प्राधान्य दिले आहे. विविध रस्ते विकासकामांसाठी बुधवारच्या (दि.10) स्थायी समिती सभेत तब्बल 55 कोटी रुपये खर्चाचे विषय आहेत. नुकतेच समितीने रस्ते विकासासाठी तब्बल 425 कोटी रुपयांच्या खर्चाला हिरवा कंदील दिला होता. पाठोपाठ आणखी कामे समितीसमोर आल्याने रस्ते कामांचे उड्डाण जोरात सुरू असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.  

महापालिका स्थायी समितीसमोर रस्ते विकसित करणे व डांबरीकरणाचे एकूण 8 नवे विषय आहेत. त्याचा एकूण खर्च 55 कोटी 6 लाख 12 हजार 971 रुपये इतका आहे. कृष्णानगरमधील शिवतेजनगर मुख्य रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी 37 लाख 64 हजार रुपये खर्च येणार असून, हे काम मे. पेव्हवे कन्स्ट्रक्शनला देण्यात येणार आहे. जोतिबानगर येथील सोनवणे वस्तीतील 24 मीटर रस्तारुंदीकरण करून स्टॉर्मवॉटर लाईन टाकून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.  त्यासाठी 1 कोटी 95 लाख 86 हजार रुपये खर्च येणार असून, ते काम एस. के. येवले अँड कंपनी यांना देण्यात येणार आहे. 

तसेच  सांगवी किवळे ‘बीआरटीएस’ रस्त्यावरील जगताप डेअरी साई चौक ते मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी 66 लाख रुपये खर्च येणार असून, हे काम एस. के. येवले अॅण्ड कंपनीला देण्यात येणार आहे.

निगडी गावठाणातील एलआयसी इमारत ते पवळे उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे.
या कामासाठी 52 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम  एस. के. येवले अॅण्ड कंपनी या ठेकेदाराला देण्यात येणार आहे.पिंपळे गुरव येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी लागणार्या 2 कोटी 71 लाख 71 हजार रुपये खर्च येणार आहे. हे काम लोणावळा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात येणार आहे. 

तसेच  सॅण्डविक कॉलनी येथील भोसरी-दिघी शिवेवरील रस्ता विकसित करण्यासाठी 80 लाख 91 हजार 968 रुपये खर्च येणार आहे. हे काम मोहनलाल मथरानी कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात येणार आहे.

तसेच मोशी-देहू रस्ता परिसरातील डीपी रस्ते विकसित करण्यासाठी 78 लाख 21 हजार 894 रुपये खर्च येणार आहे. हे काम एच. सी. कटारिया यांना देण्यात येणार आहे. हे विविध प्रस्ताव मंजुरीसाठी बुधवारी होणार्या स्थायी समितीसमोर सादर केले आहेत.दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाविष्ट गावांसह इतर भागातील रस्ते विकसित करण्यासाठी स्थायी समितीने 13 डिसेंबरच्या सभेत मान्यता दिली होती. त्यामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण, रस्ते विकसित करणे; तसेच रस्त्यांच्या कडेने विविध सेवावाहिन्या टाकण्याच्या खर्चाचाही समावेश होता. या खर्चावरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र शहरात गाजत आहे.