Sun, Mar 24, 2019 11:01होमपेज › Pune › आयुक्त व विरोधी पक्षनेत्यामध्ये खडाजंगी

आयुक्त व विरोधी पक्षनेत्यामध्ये खडाजंगी

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Sep 01 2018 1:32AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केलेल्या विविध शंका व प्रश्‍नांवर समाधानकारक उत्तरे न देता आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी स्मार्ट सिटी योजनाबाबत तुमचे अज्ञान दिसत आहे, असे भाष्य केले. त्यावर संतापलेल्या साने यांनी आयुक्तांना फैलावर घेत सुनावले आणि ते बैठक सोडून निघाले. भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी त्यांना बसण्यास सांगितले; मात्र आयुक्तांचा निषेध करीत ते दालनातून बाहेर पडले. हा प्रकार खासदार व आमदारांच्या समोर घडला.

बैठक शुक्रवारी (दि.31) आयुक्त दालनात झाली. या वेळी महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, आ. जगताप, आ. महेश लांडगे, पक्षनेते पवार, पदाधिकारी, नगरसेवक, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते म्हणून साने यांनी पहिल्यांदा सदर बैठकीस हजेरी लावली होती. 

अगोदर विकसित असलेल्या पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या भागांचा स्मार्ट सिटीसाठी निवड केली आहे. त्याऐवजी ग्रामीण भागांची निवड केली असती, तर चांगला विकास झाला असता, असा मुद्दा साने यांनी बैठकीत उपस्थित केला. तसेच, खासदार अमर साबळे यांनी स्मार्ट सिटीत शहरातील काही झोपडपट्ट्यांचा समावेश करण्याची मागणी केली. 

तुमच्या सत्ताकाळात ही निवड झाल्याची माहिती आ. जगताप यांनी दिली. आयुक्त हर्डीकर म्हणाले की, शहरातील नागरिकांकडून ऑनलाईन माध्यमातून मतदान घेऊन ही निवड केली आहे. त्यावर साने म्हणाले की, ग्रामीण भागांतील ग्रामस्थ, कामगार व शेतकरी हे अज्ञानी आहेत. त्यांना ऑनलाईन मतदानाबाबत काही माहिती नव्हती. सुशिक्षित व आयटीचा लोकांचा भरणा असलेल्या पिंपळे सौदागर भागांची निवड करण्यात आली आहे. तसेच, वायसीएम रूग्णालय व जलशुद्धीकरण केंद्रात सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ही वीज पालिका 3.62 पैसे दराने विकत घेणार आहे. मात्र, ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात ठेकेदाराला प्रत्येक टनास 504 रुपये टिफींग चार्ज देऊन 5 रुपये प्रतियुनिट दराने पालिका वीज खरेदी करणार आहे. वीज दरातील या तफावतीवर साने यांनी आक्षेप घेतला. 
उत्तर देताना हर्डीकर म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्प हा केंद्राचा आहे. स्मार्ट सिटी योजना आणि पालिकेच्या योजनेमध्ये गलत करू नका. तुम्ही स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबत अज्ञानी असून, माहिती घेऊन बोला. या अनपेक्षित उत्तराने साने संतप्त होऊन आक्रमक झाले. त्यांनी आयुक्तांना फैलावर घेतले. तुम्ही पगारी नोकर आहात. तुम्हाला ही भाषा शोभत नाही. आम्ही पालिकेचे विश्‍वस्त आहोत. पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान राखा. मी सज्ञान असून, विचारलेल्या प्रश्‍नांचे तुम्ही उत्तरे द्या. 15 वर्षांपासून मी जनतेतून निवडून  येत आहे.  आम्ही काय ‘टाईमपास’ करायला येथे येत नाही, असे साने यांनी आयुक्तांना सुनावले. साने यांचा हा अवतार पाहून उपस्थित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सदस्यांसह अधिकारी अवाक झाले. आ. जगताप व पक्षनेते पवार यांनी त्यांना बसण्यास सांगितले. मात्र, ते काही न ऐकता बैठकीतून तावातावाने निघून गेले. 

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना साने म्हणाले की, स्मार्ट सिटीची माझी पहिलीच बैठक होती. त्याबाबत मी अधिकारी निलकंठ पोमण यांच्याकडे माहिती मागविली होती. ती दिली गेली नाही. त्यामुळे बैठकीत विचारलेल्या प्रश्‍नांची माहिती देणे आयुक्तांकडून अपेक्षित आहे. अडचणीचे प्रश्‍न विचारल्यावर त्यांचे संतुलन सुटले. आवाज चढविला. नगरसेवकांशी बोलताना त्यांनी चढ्या आवाजाने बोलणे अपेक्षित नाही. आयुक्त विरोधी पक्षनेत्याशी असे बोलत असतील तर नगरसेवकांशी कसे बोलत असतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आयुक्त हे भाजपचे प्रवक्ते झाल्याचा आरोप त्यांनी केला.