Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Pune › स्वाइन फ्लू रोखण्यासाठी प्रशासनाने उचलले पाऊल 

स्वाइन फ्लू रोखण्यासाठी प्रशासनाने उचलले पाऊल 

Published On: Sep 13 2018 1:46AM | Last Updated: Sep 13 2018 1:06AMपिंपरी : प्रतिनिधी 

सध्या पिंपरी- चिंचवड शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूसारख्या आजाराने यंदा कहर माजविला आहे. आजपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यामुळे होणार्‍या गर्दीमुळे साथीचे आजार, डेंग्यू आणि स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने यापूर्वी नियमित सुरू असलेल्या उपाययोजनांसह जनजागृती फ्लेक्स, बस, रिक्षा याद्वारे जनजागृती मोहीम सुरू करणार आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली.

स्वाईन फ्लूबाबत पुढारीने वारंवार सविस्तर वृत्त दिल्याने अखेर पुढारीच्या दणाक्याने वैद्यकीय प्रशासनास जाग आली. आणि गणेशोत्सव काळात परिस्थिती आणखी गंभीर होवू नये यासाठी उपाय योजना करण्याचे पाऊल उचलले. 

स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे लगेच एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे विषाणूंचा प्रसार होतो. सर्वत्र झपाट्याने पसरणार्‍या  स्वाइन  फ्लूवर वेळीच आळा घालणे फार महत्त्वाचे आहे. विषाणूच्या संपर्कात आल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढतो मग या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यासाठी पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने जनजागृती मोहिम सुरु आहे. तरीही अद्याप स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा कहर वाढताना दिसत आहे. 

गणेशोत्सवासाठी करण्यात येणार्‍या विशेष उपाय योजना 

महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत गणेशोत्सव काळात शहरातील प्रत्येक मंडळास दोन जनजागृती फ्लेक्स देण्यात येणार आहेत. गणेश मंडळांनी दिलेले फ्लेक्स लावणे आश्यक आहे. त्यासाठी 2 हजार फ्लेक्स छपाई करण्यात आली आहे. तर 200 मंडळांना फ्लेक्सचे वाटल करण्यात आले आहे. शासनाकडून शहरामध्ये स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करणारी व्हॉल्वो बस मागविण्यात आली आहे. तसेच आठ रिक्षा शहरामध्ये स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करणार आहेत. बस आणि रिक्षाव्दारे स्वाईन फ्लूबाबत घोषणा आणि खबरदारीविषयी माहिती देण्यात येणार आहे.  

यापूर्वी स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आठही रुग्णालयात सर्व औषधे आणि लसीकरण उपलब्ध आहेत. तसेच खासगी रुग्णालयांची बैठक घेऊन त्यांनाही अशा प्रकारच्या रुग्णांची माहिती देण्यास सांगितले आहे. गरोदर महिला, मधुमेहाचे रुग्ण यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. स्वाईन फ्लूबद्दल जनजागृतीसाठी माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व आठही रुग्णालयातील अधिकार्‍यांचा एक वॉटस अप ग्रुप तयार केला आहे. त्याव्दारे रोज रुग्णांवर होत असलेल्या उपचाराचा फिडबॅक घेतला जातो.