होमपेज › Pune › पालिका, बीआरटी, मेट्रोत समन्वयाचा अभाव

पालिका, बीआरटी, मेट्रोत समन्वयाचा अभाव

Published On: Aug 15 2018 1:21AM | Last Updated: Aug 15 2018 12:42AMजयंत जाधव

पिंपरी ः

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या  शहरातील गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी या दुहेरी जलदगती बस मार्गास (बीआरटीएस) मुंबई उच्च न्यायालयाने अखेर ‘हिरवा कंदील’ दिला आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांमध्ये 25 किलोमीटर अंतराच्या मार्गावर जलद गतीने बससेवा सुरू करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व पालिकेचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दावा केला आहे. परंतु; हा मार्ग ज्या पुणे-मुंबई महामार्गावरून जातो त्या मार्गावरच सध्या पुणे मेट्रोचे काम सुरू असून हे काम सुरू असताना आत्तापर्यंत मेट्रो व महापालिकेत कुठलाही योग्य समन्वय नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे हा देशातील पहिला दुहेरी ‘बीआरटी’ मार्ग ठरणार असल्याचे कौतुक असले तरी या संस्थांमधील समन्वयाअभावी त्याची अडथळ्यांची शर्यत खरेच थांबणार का, हा खरा सवाल आहे. 

पालिकेच्या शहरातील चार बीआरटीएस मार्गांपैकी या मार्गास केंद्राची 2006 ला मान्यता मिळाली होती. पालिकेने 2008 ला डीपीआर सादर केला. त्यास 2010 ला मंजुरी मिळाली. त्यानंतर 3 वर्षांनी 2013 ला या कामास सुरुवात झाली. रस्ते काम सोडून आतापर्यंत या मार्गावर पालिकेने तब्बल 27 कोटी रूपये खर्च केला आहे.  बस थांबे व लेन तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षा कारणांवरून अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे बससेवा सुरू करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती. 

न्यायालयाअंतर्गत ही बाब असली तरी याच 80 फुटी महामार्गावर महापालिकेचा ग्रेडसेपेरेटर, असून त्या बाजूला दुहेरी सेवा रस्ता (सव्हिर्र्स रोड) आहे. परंतु; या मार्गावर आता दोनही बाजूला बीआरटीएस व मेट्रो आल्याने या मार्ग आता छोटा झाला आहे. मेट्रोने मध्यंतरी महापालिकेची परवानगी न घेता पिंपरीतील या मार्गावरील बीआरटीच्या जागेत मेट्रोचे सुमारे वीस फुटी पीलर टाकले होते. महापालिकेने ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर मेट्रोला हे पीलर काडून पुन्हा सर्व्हिस रोडला टाकावे लागले. यात मेट्रोचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच असून बीआरटीला विलंबही झाला आहे. याचाच अर्थ या तीनही  संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव आहे.     

दरम्यान; पालिकेने या मार्गावर आयआयटी पवईच्या तज्ज्ञांच्या पथकाच्या अहवालानुसार सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. तसेच, माजी महापौर नितीन काळजे यांनी एकदा आणि तक्रारदारांसह 2 वेळा या मार्गाची ‘ट्रायल रन’  घेतली. या संदर्भातील अहवाल पालिकेने न्यायालयात सादर केला. न्यायालयाने सदर मार्ग सुरू करण्यास गुरुवारी (दि. 9) मंजुरी दिली आहे. मार्गाचा दर महिन्यास आयआयटी पवईद्वारे पाहणी करून सुरक्षा अहवाल न्यायालयास सादर केला जाणार आहे, असा पाालिकेचा दावा आहेे.  मार्गावरील सर्व थांबे तयार असून, केवळ पीएमपीएलकडून ‘आयटीएमएस’ ही यंत्रणा (थांब्यावर बस आल्यानंतर दरवाज्याची उघड व झाप ही स्वयंचलित यंत्रणा) कार्यान्वित केल्यानंतर बससेवा सुरू होईल. त्यासाठी 10 दिवसांचा कालावधी पुरेसा आहे, असा दावा त्यांनी केला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस थांबे, चौक, ‘मर्ज इन’ व ‘मर्ज आऊट’ येथे पीएमपीएलकडून सुरक्षारक्षक नेमला जाणार आहे. मेट्रोचे काम काही ठिकाणी सुरू असून, तेथे बस सर्व्हिस रस्त्यावरून धावणार आहे.  
या मार्गावर दापोडी ते निगडी या दुहेरी बीआरटी मार्गावर एकूण 36 बस थांबे आहेत. त्यावरून पीएमपीएलचे प्रतिदिनी एकूण 276 बस धावणार असून, सुमारे 2 हजार 200 ते 2 हजार 300 फेर्‍या होणार आहेत. पुणे स्टेशन, हडपसर, येरवडा, अप्पर इंदिरानगर, कात्रज, कोथरूड, कोथरूड डेपो, वाघोली, पुणे मनपा, वारजे माळवाडी या प्रमुख मार्गांवरील बस धावणार आहेत.