Thu, Apr 25, 2019 23:24होमपेज › Pune › ड्रेनेज नसतानाही घराघरांत शौचालय

ड्रेनेज नसतानाही घराघरांत शौचालय

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 12:57AM

बुकमार्क करा

मिलिंद कांबळे 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील सर्वच झोपडपट्टींतील घरांमध्ये वैयक्तिक शौचालये मोफत बांधून दिली जात आहेत. भूमिगत मैला-सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज लाईन) नसतानाही निव्वल ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी घराघरांत वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यामुळे मैलापाणी गल्लीतून वाहत असल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. घरात शौचालय असून, नाईलाजास्तव रहिवाशांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या या अजब कारभाराबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहर हागणदारीमुक्त करण्याचा चंग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बांधण्यात आला आहे. त्यासाठी शहरातील सर्वच झोपडपट्टींतील घरांमध्ये वैयक्तिक शौचालये मोफत बांधून दिली जात आहेत. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत शहरातील एकूण 11 हजार 684 कुटुंबांना वैयक्तिक शौचालये बांधून दिली जाणार आहेत. लाभार्थीस केंद्राचे 4 हजार, राज्याचे 8 हजार व महापालिकेचे 4 हजार असे एकूण 16 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. महापालिकेने एकूण 8 हजार 64 घरगुती शौचालये बांधून दिली असून, ‘सीएसआर’अंतर्गत एकूण 2 हजार 856 शौचालये उभारण्यात आली आहेत. 

मात्र, ड्रेनेज लाईन असल्याशिवाय शौचालये बांधता येत नाहीत; मात्र भोसरी एमआयडीसीतील बालाजीनगर झोपडपट्टीत अनेक घरांमध्ये शौचालये बांधून वर्षे होत आली, तरी शौचालयास ड्रेनेजचा जोड नसल्याने ती वापरता येत नाहीत. नाईलाजास्तव त्यांचा वापर केल्यास गल्लीतून हे मैलामिश्रित पाणी वाहते. म्हणून रहिवासी सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत आहेत. यासंदर्भात महापालिका व क्षेत्रीय कार्यालयाक्रडे वारंवार तक्रारी केल्यानंतर लवकरच ड्रेनेज लाईन टाकली जाईल, अशी उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत; मात्र अद्याप ड्रेनेज लाईन टाकली गेली नसल्याने रहिवाशांची समस्या कायम आहे. 

बाजालीनगरचे रहिवाशी सिद्धेश्‍वर कांबळे यांनी सांगितले की, घरात मोठ्या हौसेने अनुदान आणि स्वत: चे पैसे लावून छान शौचालय तयार करून घेतले; मात्र वर्ष होत आले, तरी अद्याप त्यास ड्रेनेज लाईन न जोडल्याने त्याचा वापर करता येत नाही.