पिंपरी ः संजय शिंदे
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता प्रस्थापित झाल्याने, आता तरी आपले सत्तेच्या माध्यमातून भले होईल अशी भाबडी अपेक्षा भाजपाच्या जून्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना होती; मात्र पालिकेच्या उमेदवारीपासून ते सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर विविध पदे ही पक्षात ऐन निवडणुकीच्यावेळी बाहेरील पक्षातून आलेल्यांना मिळाल्यामुळे शहरातील जून्या निष्ठावंताच्यामध्ये राग व्यक्त होत आहे. गप्प बसून काही मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर सोशल मीडियातून पक्षातील वागणूकीवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल करण्यास कार्यकर्त्यांनी सुरूवात केल्यामुळे पक्षात एकच खळबळ माजली आहे.
मार्च 2017 च्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर जवळपास तेरा ते पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता पालिकेवर होती. सध्या भाजपाच्या उमेदवारीवर जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यापैकी ऐंशी टक्के नगरसेवक व पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर पक्षाचे नेतृत्व व काम करत होते.
लोकसभा आणि विधानसभेत निवडणुकींमध्ये भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर पालिकेमध्ये ही सत्तांतर होणार ही परस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अनेकांनी स्वार्थासाठी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांना पक्षाने निवडून येण्याच्या धर्तीवर उमेदवारी दिली. त्यामध्ये अनेक निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवारी नाकारल्यानंतर ही किमान सत्ता आल्यानंतर आपल्या निष्ठावंतपणाचा विचार करून पदे मिळतील अथवा सत्तेचा गोडवा चाखता येईल, असा विश्वास जून्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना होता; परंतु या विश्वासाला तडा गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागल्या आहेत.
सत्ता आल्यानंतर विविध महामंडळे, जिल्हास्तरीय समित्या, विषेश कार्यकारी दंडाधिकारी ही पदे आपल्याला एवढी वर्षे पक्षासाठी काम केल्याबद्दल मिळतील अशी अपेक्षा होती; मात्र ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नसल्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्ते, पदाधिकार्यांकडून काही ठिकाणी हिणवले जात असल्याने अपमानाचा लाव्हा दाबून ठेवलेले कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. याबाबत संबंधितांनी प्रदेश स्तरावर ही तक्रारी केल्याचे समजते.
सत्ता आल्यानंतर पक्षसंघटनेचे कामाला ही ‘ब्रेक’ लागल्याची चर्चा खुद्द नगरसेवकांमध्येच आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांनी दोन ते तीन वेळा बैठका घेऊन संबंधित पदाधिकार्यांचे कान टोचले आहेत. तरीही पक्षसंघटनेच्या कामाला बळ मिळत नसल्याचे आता पक्षाचे निष्ठावंत व जुने कार्यकर्ते खुलेआम बोलू लागल्यामुळे आणि कार्यकर्त्यांना पक्षात मिळत नसलेल्या मानामुळे येवढे दिवस दाबून ठेवलेला राग सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागला आहे.