Wed, Mar 27, 2019 04:06होमपेज › Pune › मावळ व शिरूरमध्ये भाजपची मोर्चेबांधणी

मावळ व शिरूरमध्ये भाजपची मोर्चेबांधणी

Published On: Aug 20 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 1:07AMपिंपरी : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती झाली तरी मावळ व शिरूरवर दावा करण्याचे अन् यापैकी एक मतदारसंघ पदरात पाडून घेण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. त्यानुसार पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला  आहे. मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र क्षेत्रप्रमुख, प्रत्येक विधानसभेसाठी विस्तारक, प्रत्येक मतदान केंद्रासाठी शक्ती केंद्रप्रमुख, एका बूथसाठी 25 कार्यकर्ते आणि मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी स्वतंत्र कार्यकर्ता अशा पद्धतीने तयारी केली आहे. संघटनात्मक बांधणीचा कालबद्ध कार्यक्रमही आखण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यातून काबीज केल्यानंतर आता भाजप मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुसाठी युती न झाल्यास मावळ आणि शिरूरचा गड जिंकण्याच्या उद्देशाने भाजपच्या नेत्यांची पावले पडू लागली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने कालबद्ध कार्यक्रम ठरवला आहे. नवमतदार नोंदणी, मतदार याद्यांचे वाचन, बूथप्रमुखांचे प्रशिक्षण, मतदार यादीतील पान प्रमुखांचे प्रशिक्षण, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत मेळावे, ग्रामीण भागात तालुकास्तरावर बूथप्रमुखांचे अभ्यासवर्ग घेण्याचे पक्षाचे नियोजन आहे. 

लोकसभेच्या तयारीसाठी एक लोकसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघांसाठी विस्तारक काम करणार आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रासाठी शक्ती केंद्रप्रमुख, एका बूथसाठी 25 कार्यकर्ते (त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर करणारे 5, दुचाकी वापरणारे 5 आणि 5 महिला व 5 युवकांचा समावेश आहे.) याशिवाय सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे. मावळ आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत; परंतु दोन्ही मतदारसंघांत भाजपची राजकीय ताकद वाढली आहे; त्यामुळे युती झाली तरी या दोन्ही मतदारसंघांवर भाजप दावा करणार आहे. 

राजकीय चर्चेतून दोनपैकी एक मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच युती न झाल्यास दोन्ही मतदारसंघांत राजकीय ताकद पणाला लावण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमांद्वारे भाजप निवडणुकीसाठी सज्ज होत आहे.मावळमध्ये भाजपकडे आ. लक्ष्मण जगताप; तर शिरूरमध्ये आ. महेश लांडगे हे सक्षम उमेदवार आहेत. त्या दृष्टीने पक्षाची चाचपणी सुरू आहे.