Mon, May 27, 2019 07:35होमपेज › Pune › आळंदीचे भाजप नगरसेवक कांबळे यांचा भरदिवसा खून

आळंदीचे भाजप नगरसेवक कांबळे यांचा भरदिवसा खून

Published On: Jun 26 2018 6:26PM | Last Updated: Jun 26 2018 6:26PMपिंपरी/आळंदी : प्रतिनिधी        

आळंदी नगरपरिषदेच्या नगरसेवकाचा अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून भरदिवसा खून केला. ही घटना वडमुखवाडी येथे मंगळवारी (दि. 26) दुपारी चारच्या सुमारास घडली. बालाजी कांबळे (वय-36, रा. साई कॉलनी, देहू रस्ता, आळंदी देवाची) असे खून झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. सन 2017 मध्ये झालेल्या आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून कांबळे भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी नगरपरिषदेचे भाजपाचे नगरसेवक बालाजी कांबळे वडमुखवाडी येथे खासगी कामानिमित्त आले होते. त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. कोयत्याने डोक्यात सपासप वार केल्याने कांबळे गंभीर जखमी 
झाले. 

नागरिकांनी कांबळे यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी  जाहीर केले. उत्तरीय तपासणीसाठी कांबळे यांचा मृतदेह पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आणल्यानंतर काही वेळातच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. त्यांच्या मारेकर्‍यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात येत होती. रुग्णालयात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कांबळे यांनी नुकतेच बांधकाम व्यवसायात पदार्पण केले होते. हल्ल्याच्या सर्व शक्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.  घटनस्थळावरून फरार झालेल्या आरोपींच्या शोधात पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कांबळे कुटुंबीय मूळचे मराठवाडा भागातील आहेत. कांबळेच्या मागे त्यांची आई, पत्नी, मुलगा, मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. 

वर्षभरापूर्वी झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत कांबळे हे आळंदी नगरपालिकेत पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. देहू रस्ता परिसरातून भाजपचे सार्वधिक नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मागील दोन वर्षांपासून तीन ते चार जणांसोबत भागिदारीत बांधकाम व्यवसाय करत. त्यांच्या आळंदी परिसरातदेखील चार ते पाच साईट सुरू आहेत. कांबळे सद्या राहत असलेल्या साई कॉलनीत त्यांचे शेजार्‍यांबरोबर काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. याच वादातून त्यांची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचे समजते. 

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्यावरदेखील असाच हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावरदेखील कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले होते. मात्र, त्यांना वेळीच उपचार मिळाल्याने ते या हल्ल्यातून बचावले आहेत.
---------------
 देहू रस्ता परिसर बनतोय गुन्हेगारी अड्डा 

नगरपरिषद निवडणुकीपासून देहू रस्ता परिसर गुन्हेगारी अड्डा बनत असून, दर दोनएक महिन्याने येते तोडफोड, मारामारीच्या, गोळीबाराच्या घटना घडत आहेत. कांबळे यांच्या खुनामुळे या परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत जगत असून, असेच चालू राहिले तर येथे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. कांबळे हे याच परिसरातील रहिवाशी असल्याने व काही राजकीय गुन्ह्यात त्यांचेही नाव असल्याने खुणामागील कारणांच्या तर्कवितर्कांना वेग आला आहे.