होमपेज › Pune › अखेर वारकऱ्यांना भेटवस्तू देण्याचा पिंपरी पालिकेचा निर्णय 

अखेर वारकऱ्यांना भेटवस्तू देण्याचा पिंपरी पालिकेचा निर्णय 

Published On: Jul 02 2018 3:40PM | Last Updated: Jul 02 2018 3:40PM



पिंपरी : प्रतिनिधी

यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना भेटवस्तू  ऐवजी अधिकाधिक सुविधा देण्याची भूमिका भाजपने घेतली होती. मात्र आज महापौर कक्षात गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत दिंडीप्रमुखांना ताडपत्री किंवा तंबू यापैकी उपलब्ध होईल ते भेटवस्तू स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका प्रशासनास याबाबत काही अडचण असेल तर नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री अथवा तंबू देऊ असे महापौर नितीन काळजे यांनी वारकऱ्यांना सांगितले.      

यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना भेटवस्तू  ऐवजी अधिकाधिक सुविधा देण्याची भूमिका भाजपने घेतली होती. त्या संदर्भात भाजपने  आज गटनेत्यांची बैठक बोलावली  होती. भेटवस्तूची परंपरा खंडीत करण्यास राष्ट्रवादी, शिवसेनेने विरोध दर्शविला होता. हा विरोध दर्शविण्यासाठी पालिका भवनसमोर टाळ कुटो आंदोलन करणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले होते.  

महापौर कक्षात महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीनंतर  चिखली, तळवडे, भोसरीतून आलेल्या वारकऱ्यांना महापौर काळजे यांनी गटनेत्यांच्या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या या शहरातून एकाच वेळी पंढरपूरकडे जातात. ही शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे वारकऱ्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा चालू ठेवली पाहिजे अशी भावना सर्वच गटनेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दिंडी प्रमुखांना ताडपत्री किंवा तंबू भेटवस्तू स्वरूपात देणार आहे. आयुक्त व प्रशासनास अडचण असेल तर नगरसेवकांच्या मानधनातून हा खर्च केला जाईल. पक्षनेते एकनाथ पवार, सेनेचे गटनेते यांनीही प्रशासनास अडचण आली तर आम्ही नगरसेवक आमच्या मानधनातून भेटवस्तू देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी पंढरीनाथ महाराज की जय च्या जयघोषात पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले. 

माहापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक कैलास बारणे उपस्थित होते.