Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Pune › महापालिकेस आपल्याच लोगोचे वावडे  

महापालिकेस आपल्याच लोगोचे वावडे  

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:56PM

बुकमार्क करा
पिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध जनजागृती, प्रबोधन, जाहिराती, शुभेच्छा आदींच्या फ्लेक्स, पत्रके, भित्तीचित्र व फलकावर महापालिकेच्या विशेष लोगो किंवा स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचा लोगोचा (बोधचिन्ह) वापर होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. आपले लोगो सोडून त्याऐवजी केंद्र शासनाचे लोगो वापरले जात आहेत. तर, दुसरीकडे पुणे महापालिका शहराचे बॅण्डींग करण्यासाठी ‘अद्वितीय पुणे’ या लोगोचा सर्वत्र वापर करीत आहे. यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेस आपल्याच लोगोचे वावडे असल्याचे स्पष्ट होत आहे. 

स्मार्ट सिटी अभियानात पिंपरी-चिंचवड शहराचा तिसरा टप्प्यात समावेश झाला आहे. स्मार्ट सिटीची एसपीव्ही कंपनी स्थापना होऊन संचालक मंडळाच्या दोन बैठकाही पार पडल्या आहेत. स्मार्ट सिटीतील कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी, महापालिका स्मार्ट सिटीचा लोगोचा प्रसार आणि प्रचार करीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. 

महापालिकेच्या वतीने नियमितपणे विविध कार्यक्रम, महोत्सव, सोहळे घेतले जातात. त्यासाठी शहराभरात फ्लेक्स लावून प्रसिद्धी केली जाते. तसेच, शेकडो निमंत्रणपत्रिका छापल्या जातात. नागरिकांना माहिती देण्यासाठी माहितीपत्रके व भित्तीपत्रकेही वाटली जातात.  सध्या सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियनासाठी शहरभरात असंख्य होर्डीग्ज लावले गेले आहे. स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन त्या माध्यमातून केले जात आहे. तसेच, शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेर्‍या काढल्या जात आहेत. या फ्लेक्स व फलकावर महापालिकेच्या लोगोव्यक्तिरिक्त शहराचा कोणताही लोगो नाही. शहर स्वच्छतेचा लोगो, विशेष लोगो किंवा स्मार्ट सिटीचा लोगो वापरला केलेला नाही. त्या ऐवजी केंद्राचे स्वच्छ भारत व स्मार्ट सिटीचा लोगो वापरले आहेत.  

पुणे महापालिका आपल्या शहराचे वेगवेगळ्या प्रकारे बॅण्डींग करीत आहे. त्यासाठी ‘अद्वितीय पुणे’ असे विशेष स्वतंत्र लोगो तयार केला आहे. महापालिकेचे विविध सर्व कार्यक्रम, वृत्तपत्रातील जाहिराती आदी सर्व ठिकाणी या लोगोचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे पुणे शहराचे बॅण्डींग होत आहे. त्याचबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा लोगोही पुणे महापालिकेकडून वापरला जातो आहे. सर्व ठिकाणी सतत या लोगोचा वापर होत असल्याने सदर लोगोद्वारे शहराचे बॅण्डींग केले जात आहे. त्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. 

मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहराचे बॅण्डींग करण्यासाठी कोणतेची पावले अद्याप उचलली नाहीत. त्यामुळे त्याचासाठी स्वतंत्र लोगो अद्याप तयारच करण्यात आलेला नाही. तसेच, स्मार्ट सिटीचा लोगोचा वापरावबात महापालिका प्रशासन उदासीन दिसत आहे. शहराचे बॅण्डींग करण्याची जबाबदारी महापालिकेची असताना प्रशासन त्याबाबत सपेशल कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.