Fri, Apr 26, 2019 19:28होमपेज › Pune › काँग्रेस शहराध्यक्षांपाठोपाठ पदाधिकार्‍यांचेही सामुहिक राजीनामे

काँग्रेस शहराध्यक्षांपाठोपाठ पदाधिकार्‍यांचेही सामुहिक राजीनामे

Published On: Jul 09 2018 10:40PM | Last Updated: Jul 09 2018 10:40PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराकडे पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करतात, ते पाठबळ देत नसल्याने पक्ष वाढणार कसा असा सवाल करत काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी (दि.8) पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला होता. आज दुसर्‍या दिवशी पक्षाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सामुहिक राजीनामे देऊन साठे यांना पाठिंबा दर्शविला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे हे राजीनामे सादर केले गेले आहेत. यामुळे शहर काँग्रेसचे आता काय होणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे.

काल दादर येथील टिळक भवन येथे झालेल्या जिल्हा पदाधिकार्‍यांच्या व्यथा मांडून काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा दिला. आज पक्षात राजीनामा सत्र सुरूच राहिले पक्षाच्या अन्य पदाधिकार्‍यांनीही आपले सामुहिक राजीनामे दिले आहेत. या पदाधिकार्‍यांमध्ये महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश एस.सी विभागाचे उपाध्यक्ष गौतम आरगडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे लक्ष्मण रूपनर, मावळ लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश कंधारे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी विभागाचे किशोर कळसरकर, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णू नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, प्रदेश महिला काँग्रेस सचिव बिंदू तिवारी, एनएसयूआयचे अध्यक्ष विशाल कसबे, मयुर जैस्वाल, सज्जी वर्की यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे पाठविले आहेत. यामुळे शहर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षाच्या व्यासपीठावर शहरातील कार्यकर्त्यांची व्यथा मांडली. त्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत आहोत. त्यामुळे आमच्यावर असलेल्या जबादारीतून मुक्त करुन आमचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती राजीनामा पत्रात केली आहे. तसेच पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल ऋण व्यक्त करत पुढील काळात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहू, असे म्हटले आहे.